Published On : Tue, Feb 6th, 2018

आॅटोचालकांवर उपासमारीची वेळ!

Advertisement


नागपूर: खासगी वाहनामुळे आॅटोचालकांचा व्यवसाय संकटात आला असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी वाहनाला नागपूर रेल्वेस्थानकावर परवानगी देऊ नका, या प्रमुख मागणीसाठी लोकसेवा प्रिपेड आॅटोचालक-मालक टॅक्सी संघटनेने सोमवारी सकाळी ११ ते ४ या वेळात कामबंद आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी खासगीच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मध्य रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच ओला कॅबला नागपूर रेल्वेस्थानकावर परवानगी दिली. त्यामुळे आॅटोचालकांत रोष आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून आॅटोचालक आहेत. ते प्रिपेड बुथच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देत आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीत वाढ होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खासगी वाहनासाठी रितसर निविदा काढल्या आणि जानेवारी महिन्यात ओला कॅबला परवानगी देण्यात आली. त्यांना दहा दिवसात काही लाख रक्कम भरायची होती. ही बाब स्टेशनवरील आॅटोचालकांना माहिती पडताच त्यांनी हालचाली सुरू केल्या. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाºयांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना कळविल्या तसेच निवेदनावर लवकर तोडगा काढण्याची विनंतीही केली. मात्`??, रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर आॅटोचालक संघटनांना मिळाले नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सोमवारी त्यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी पाठिंबा दिला. तसेच शहर आॅटोचालक संघटनांनीही पाठिंबा दिला.

आज सकाळपासूनच कामबंद आंदोलन असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. विविध गाड्यांनी नागपूर स्थानकावर आलेल्या प्रवाशांना शहरात जाण्यासाठी स्टेशन बाहेरून वाहनाची प्रतीक्षा करावी लागली. दिवसभर चाललेल्या आंदोलनात संघटनांच्या प्रतिनिधींनी आॅटोचालकांची भूमिका सांगितली. यावेळी अलताफ अंसारी, शफिक अंसारी, अशफाक खान, संतोष बमनेले, नायारायण हेडाऊ, असलम अंसारी, शेख हनिफ, शेख मुख्तार, अली गवंडर, फिरोज खान यांच्यासह शेकडो आॅटोचालकांचा समावेश होता.