
नागपूर : उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्यातील गोठण गाव गेट परिसरातील घोटाळा भागात मंगळवारी सायंकाळी वाघाचे दुर्मीळ दर्शन घडल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर शहरातील हॉटेल व्यवसायाशी संबंधित तसेच नागपूर टुडेचे नियमित व्ह्यूअर हर्षल रामटेके यांनी आपल्या कुटुंबासह वनभ्रमंतीदरम्यान हा अविस्मरणीय क्षण अनुभवला.
माहितीनुसार, हर्षल रामटेके हे आपल्या परिवारासोबत उमरेड-करांडला वनपरिक्षेत्रातील गोठण गाव गेटमार्गे घोटाळा परिसरात सफारीसाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास तलावाजवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या एका रुबाबदार वाघाचे त्यांना दर्शन झाले. काही क्षणांसाठी झालेल्या या दर्शनाने संपूर्ण कुटुंब रोमांचित झाले.
विशेष म्हणजे, हर्षल रामटेके यांनी आपल्या आयफोन मोबाईलमध्ये या दुर्मीळ क्षणाचे छायाचित्र आणि व्हिडिओ टिपले. त्यानंतर त्यांनी ही दृश्ये नागपूर टुडेकडे पाठवून वाचकांसाठी एक अनमोल वन्यजीव अनुभव उपलब्ध करून दिला.
सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यापासून जंगल सफारी बंद होण्याची शक्यता असल्याने सफारी हंगामाच्या अखेरीस मिळालेले हे वाघाचे दर्शन पर्यटकांसाठी विशेष ठरत आहे. नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरणाऱ्या वाघाचे असे सहज दर्शन क्वचितच घडत असल्याने हा अनुभव रामटेके कुटुंबासाठी संस्मरणीय ठरला.
नागपूर टुडे परिवारातर्फे आमचे नियमित व्ह्यूअर हर्षल रामटेके यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी पाठविलेली ही दुर्मीळ छायाचित्रे आणि व्हिडिओ वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.
रविकांत कांबळे




