
नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ परिसरात आज पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली. मांढळ–पचखेडी मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाच्या परिसरात रस्त्यावरून निर्धास्तपणे फिरताना हा वाघ काही नागरिकांच्या नजरेस पडला.
या घटनेचा व्हिडिओ वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनांनी वाघ दिसताच गाड्या थांबवल्या, तर काहींनी सावधगिरी बाळगत मागे वळून सुरक्षित अंतर ठेवले. एका दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत तत्काळ आपली दिशा बदलली, तर एका चारचाकीच्या अगदी जवळून वाघ जात असल्याचे दृश्य व्हिडिओत दिसत आहे.
सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळेस घडली. त्या वेळी पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांची किंवा ग्राहकांची वर्दळ नव्हती. गर्दीच्या वेळी वाघ आढळला असता, तर गंभीर अपघात किंवा जीवितहानीची शक्यता नाकारता आली नसती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात नव्या नर वाघाची नोंद झाली आहे. ‘शिलेदार’ असे नामकरण करण्यात आलेला हा वाघ अलीकडे प्रकल्पाच्या हद्दीत दिसून आला. तो चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील ‘तारा’ या वाघिणीच्या अधिवासात वावरताना आढळल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी शिलेदार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला होता. त्यानंतर २०२५ मध्ये तो राधानगरी अभयारण्य परिसरातही दिसून आला होता. सध्या सह्याद्री प्रकल्पांतर्गत चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर बाजी, सुभेदार आणि सेनापती हे नर वाघ आधीपासून येथे आहेत. आता शिलेदारच्या आगमनामुळे प्रकल्पातील व्याघ्रसंख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








