नागपूर : संतांची आणि सज्जनांची संगत लाभल्यास भगवंताशी संवाद साधण्याचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी केले. वैकुंठ चतुर्दशीचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महापौर कीर्तन महोत्सव सोमवारी (ता. २३) भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात रंगलेल्या या महोत्सवात कानेरकर महाराज यांनी आपल्या ओजस्वी कीर्तनातून उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले.
कार्यक्रमाला दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, झोन सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मनपा अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात महापौर नीता ठाकरे यांनी मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तरुण पिढीला सनातन संस्कृती आणि वारकरी परंपरेशी जोडण्याच्या उद्देशाने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी घेतलेल्या परिश्रमांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले. महोत्सवानिमित्त सकाळी रांगोळी स्पर्धा, तर सायंकाळी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार मोहन मते यांनी महापौर नीता ठाकरे यांच्या पुढाकारातून दक्षिण नागपुरात वारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाल्याचे नमूद केले. धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात जनजागृती होण्यासोबतच सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन होते. दक्षिण नागपुरातील अन्य नगरसेवकांनीही अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कीर्तनातून ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी संतसंगतीचे महत्त्व विशद केले. संतांच्या आणि भगवंताच्या मार्गावर चालताना स्वार्थ आणि परमार्थ यांचा समतोल कसा साधावा, हे त्यांनी अभंगांच्या माध्यमातून उलगडून सांगितले. संतांची आणि सज्जनांची संगत लाभल्यास भगवंताशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
संतांच्या संगतीमुळे भगवंताचे दैवी स्वरूप अनुभवता येते, तर संतांच्या शिकवणीनुसार आणि शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार आचरण केल्यास सामान्य भौतिक जीवनालाही आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे दाखले देत त्यांनी संतसंगतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्याचे आवाहन करीत नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे कौतुक केले.
रांगोळी स्पर्धेत प्रेमा रेके प्रथम
महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रेमा रेके (सांकेतिक क्रमांक २७) यांनी प्रथम, आराध्या मांडवकर (२९) यांनी द्वितीय, तर अंकिता तेटे (४५) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
प्रोत्साहनपर पारितोषिके मयुरी वैरागडे, वर्षा मेंढे, सपना भालेकर, स्वप्नील नवलाखे, विद्यानी जिचकार, सुजाता बोडखे, युवांक्षी पराले, पूजा चव्हाण, मीनल कुबडे आणि श्रुतिका रोकडे यांना प्रदान करण्यात आली.
दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळ अव्वल
दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळाने प्रथम, तर सहकारनगर येथील जय गजानन मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला. भजन स्पर्धेत चैतन्य भजन मंडळाने प्रथम, नारी शक्ती भजन मंडळाने द्वितीय, तर श्री शिवशक्ती भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
वाद्यवृंदांची सुरेल साथ
कीर्तनाला रोशन महाराज केवटे यांनी पखवाजाची साथ दिली. शुभम महाराज देहनकर, उज्ज्वल महाराज उरकडे, कुणाल महाराज पांडे आणि आदित्य महाराज वाशिमकर यांनी गायन केले. तर रुद्र महाराज तिजारे आणि अर्षित महाराज अलवारे यांनी टाळकरी म्हणून साथसंगत केली.
वारकरी संप्रदायासह शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





