वाशिम : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारकडे सादर करावेत. केवळ माध्यमांसमोर वक्तव्य करून टीका करणे योग्य नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. तक्रार प्राप्त झाल्यास महसूल विभागामार्फत निश्चितपणे चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल नार्वेकर हे सज्जन व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर विनाकारण आरोप करणे योग्य नाही. नार्वेकर यांनीही या प्रकरणात मानहानीचा दावा करण्याचे स्पष्ट केले आहे. आदिवासी समाजानेदेखील यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही संजय राऊत यांना चौकशी हवी असेल तर सरकार त्यासाठी तयार आहे. मात्र, आधी त्यांनी अधिकृत तक्रार द्यावी, असे बावनकुळे म्हणाले.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेची काळाची गरज-
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी याचे समर्थन केले. लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्रफळ मोठे असल्याने लोकप्रतिनिधींना संपूर्ण मतदारसंघात फिरणे आणि विकासकामांवर लक्ष ठेवणे कठीण जाते. त्यामुळे मतदारसंघांचा आकार लहान असणे आवश्यक आहे. मतदारसंघ जितका लहान, तितका विकास अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले.
डिलिमिटेशनला प्रत्येक पक्षातील आमदार आणि खासदारांचा पाठिंबा आहे. मात्र, काँग्रेसच्या दबावामुळे काही लोकप्रतिनिधी आपली भूमिका उघडपणे मांडत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना आणि अडचणी समजून घेत डिलिमिटेशनला साथ देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भूदान जमिनींच्या गैरव्यवहाराची चौकशी; एसआयटीचे संकेत-
भूदान चळवळीअंतर्गत भूमिहीनांना कसण्यासाठी दिलेल्या जमिनींची विक्री झाल्याचे प्रकार समोर आल्याचे सांगत बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. भूदान जमिनींच्या अटींचा भंग झाला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि गरज पडल्यास एसआयटी स्थापन केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गैरप्रकारातून जमिनींचे हस्तांतरण झाले असल्याचे आढळल्यास संबंधित जमिनी सरकारच्या ताब्यात घेतल्या जातील. यासाठी आगामी मार्च अधिवेशनात भूदान कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, यापुढे भूदानच्या जमिनी केवळ भूमिहीन व्यक्तींनाच मिळतील, अशी तरतूद केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाशिममध्ये पाणीटंचाईवर ‘नागपूर पॅटर्न’-
वाशिम जिल्ह्यात सध्या केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक विहिरींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुजवलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, आवश्यक ठिकाणी खोदकाम आणि बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासाठी नागपूर पॅटर्न राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असून, तीन दिवसांत कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी होणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे निर्देश दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पेनटाकळी प्रकल्पातून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न-
पेनटाकळी प्रकल्पातून वाशिम जिल्ह्याला पाणी सोडण्याच्या मागणीवरही बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. या प्रश्नावर आपण स्वतः लक्ष घालणार असून, आमदारही सोबत आहेत. विभागीय आयुक्त आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवारी यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोयना प्रकल्पातील पाण्यावर चर्चा करणार-
कोयना प्रकल्पातून मुंबईला पाणीपुरवठा करण्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रकल्पातील सध्याचा पाणीसाठा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध नेमका कशासाठी आहे, याची माहिती घेणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भात सरकारसोबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
रिसोड तहसीलदार प्रकरणी कारवाईची मागणी-
रिसोड तहसीलदारांच्या चौकशीसंदर्भात बोलताना बावनकुळे यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत एसआयआर प्रक्रिया सुरू असल्याने तोपर्यंत कारवाई न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगितले. मात्र, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिम दौऱ्यादरम्यान विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली.




