
नागपूर – शहरात चोरीच्या मालिकेमुळे सतर्क झालेल्या पांचपावली पोलिसांनी अंतरराज्यीय चोरट्यांच्या सक्रिय टोळीला मोठा धक्का देत तीन सराईत आरोपींना गजाआड केले आहे. या तिघांच्या अटकेनंतर पोलिसांनी पाचपावली परिसरातील चार वेगवेगळ्या घरफोड्यांचे रहस्य उघड केले असून जवळपास साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना न्यायिक कोठडी सुनावण्यात आली.
अनेक राज्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद-
पोलिसांच्या माहितीनुसार, अटकेतील तिन्ही आरोपी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात अनेक चोरी व घरफोड्यांमध्ये सहभागी होते. या राज्यांतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
अटक केलेले आरोपी-
• शेरसिंह त्रिलोकसिंह चव्हाण (23) — उमरठी, मध्यप्रदेश
• मोहनसिंह नुरबिनसिंह चावला (20) — उमरठी, मध्यप्रदेश
• राजपालसिंह जोतसिंह भडोले (25) — अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार
या तिघांनी ६ आणि ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वैशाली नगरातील संबोधी कॉलनी येथे शुभम पसेरकर यांच्या बंद घरात चोरी केली होती. घरातून तब्बल १ लाख रुपये रोख तसेच सोने–चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज चोरून आरोपी फरार झाले होते. त्या वेळी घरातील मंडळी उमरेड येथे गेली होती.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची कारवाई-
तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोच करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत या तिघांनी पांचपावली परिसरातील आणखी तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या मार्गदर्शनावरून पोलिसांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
इतर साथीदारांचा शोध सुरू-
पांचपावली पोलिसांनी सांगितले की, या टोळीतील आणखी काही सदस्य शहरात सक्रिय असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.









