नागपूर : शहरातील कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. पथकाने मोठी कारवाई करत 52 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) पावडरसह तीन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई 19 मे 2025 रोजी सकाळी 9.30 ते 11 वाजेच्या दरम्यान मलका कॉलनी, समता नगर परिसरात करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अंकित उर्फ काल्या मनोज अंबादे (वय 26, रा. समता नगर), कश्यप अरविंद पाटील (वय 19, रा. आटा चक्की जवळ, कपिलनगर) आणि आसिफ मलिक उर्फ काम्रान शकील अहमद मलिक (वय 23, रा. वनदेवी चौक, यशोधरा नगर) यांचा समावेश आहे. या तिघांकडून 52 ग्रॅम एम.डी. पावडर, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम 11,000 रुपये असा एकूण 2 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क), 22(क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील चौथा आरोपी कुणाल उर्फ जम्बो कुंदन डोंगरे (वय 26, रा. मोठा इंदुरा, जरीपटका) हा फरार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, या फरार आरोपीवर यापूर्वीच खून, दरोडा, जबरी चोरी यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या कलम 302, 395, 394, 392, 399 अन्वये दहा गुन्ह्यांची नोंद आहे. अटक आरोपी अंकित अंबादे याच्यावरही यापूर्वी कलम 399 आणि इतर भादंवि कलमांखाली पाच गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे. पुढील तपास कपिलनगर पोलिस करीत आहेत.