नागपूर : शहरातील महाल परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयासह रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणाऱ्या निनावी पत्रामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलिस व विविध सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू करत परिसरात हाय अलर्ट घोषित केला आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित पत्र दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयात प्राप्त झाले होते. पत्र पाठवणाऱ्यांनी स्वतःला ‘डीएसएस’ या नावाने ओळख दिल्याचे नमूद करण्यात आले असून, पत्रातील भाषा आक्षेपार्ह असल्याचेही समजते.
‘सिझीयम-137’ टाकल्याचा दावा; यंत्रणांची धावपळ-
इंग्रजीत लिहिलेल्या या पत्रात संघ मुख्यालय, स्मृतिमंदिर आणि शहरातील मेट्रो परिसरात ‘सिझीयम-137’ नावाचा किरणोत्सर्गी पदार्थ पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. हा पदार्थ अत्यंत धोकादायक असल्याचा उल्लेख करत मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीनंतर तातडीने परिसराची तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोध पथक, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्याकडून सखोल पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद पदार्थ आढळला नसला तरी खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सिझीयम-137’ म्हणजे नेमकं काय?
सिझीयम-137 हा कृत्रिमरीत्या निर्माण होणारा किरणोत्सर्गी घटक असून, तो अणुभट्ट्यांमधील न्यूक्लिअर फिशन प्रक्रियेदरम्यान तयार होतो. या पदार्थाचे अर्धायुष्य सुमारे 30 वर्षे आहे. तो बीटा कणांसह तीव्र गामा किरणोत्सर्ग उत्सर्जित करतो, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
आरोग्यासाठी गंभीर धोका-
या घटकाच्या संपर्कात आल्यास त्वचेचे नुकसान, रेडिएशन आजार तसेच दीर्घकालीन कर्करोगाचा धोका संभवतो. पाण्यात सहज मिसळणारा हा पदार्थ जमिनीत व वातावरणात झपाट्याने पसरू शकतो. शरीरात गेल्यास तो स्नायूंमध्ये साठू शकतो, ज्यामुळे त्याचे दुष्परिणाम अधिक वाढतात.
मुख्यालयाभोवती कडेकोट सुरक्षा-
RSS मुख्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडे असून, सुमारे 150 जवान 24 तास तैनात असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय नागपूर पोलिस बाह्य सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून, गरजेनुसार इतर केंद्रीय दलांची मदतही घेतली जाते.
दरम्यान, या धमकीनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








