Published On : Mon, Oct 30th, 2017

‘एकता दौड’मध्ये हजारो नागपूरकरांनी सहभागी व्हावे : महापौर

Advertisement

नागपूर: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता संविधान चौकातून ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो नागपूरकरांनी सहभाग नोंदवून ‘एकते’चा संदेश द्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन कार्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजन तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त अश्विन मुदगल, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, नगरसेविका प्रमिला मंथरानी, नगरसेवक मोहम्मद इब्राहीम अहमद, नगरसेविका स्नेहल बिहारे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग प्रमुख डॉ. माधुरी मार्डीकर, जिल्हा क्रीडा असोशिएशनचे अध्यक्ष शरद सूर्यवंशी, तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, अविनाश पुंड, सहायक पोलिस निरीक्षक अजय लोंगोटकर, वाहतूक पोलिस विभागाचे गिरीश ताथोड, आदी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थितांना शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एकता दौड’ विषयीची माहिती दिली. ‘एकते’चा संदेश देण्यासोबतच या दौडच्या माध्यमातून स्वच्छतेचाही संदेश देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी आयोजनाचा आढावा घेतला. दौडमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी स्पोर्ट ट्रॅक सूट अथवा पांढरा टी-शर्ट आणि स्पोर्टस्‌ शूज घालून सहभागी होण्याचे आवाहन केले.

शिक्षण क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातील उपस्थित प्रतिनिधींनी आयोजनाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने माहिती दिली. आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व व्यवस्था आयोजन स्थळी करण्याचे निर्देश दिले. बैठकीला सर्व सहायक आयुक्त सर्वश्री अशोक पाटील, महेश मोरोणे, आर.पी. भिवगडे, जी.एम. राठोड, राजेश कराडे, पी.एल. वऱ्हाडे, सुभाष जयदेव, विजय हुमणे, हरिश राऊत, सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

असा राहील कार्यक्रम

एकता दौडच्या प्रारंभी सकाळी ७.१५ वाजता महापौर, अन्य पदाधिकारी व आयुक्त इमामवाडा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला मालार्पण करतील. त्यानंतर ७.३० वाजता संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करतील. त्यानंतर महापौर नंदा जिचकार ह्या हिरवी झेंडी दाखवून दौडला प्रारंभ करतील.

असा राहील मार्ग

संविधान चौकातून प्रारंभ होणारी ‘एकता दौड’ लिबर्टी टॉकीज चौक, व्हीसीए चौक, आकाशवाणी चौक मार्गे संविधान चौकात येईल. तेथे दौडचे विसर्जन होईल. दौड सुरू होण्याच्या प्रारंभी दौडमध्ये सहभागी होणाऱ्या नागपूरकरांना ‘एकते’ची शपथ देतील.

इंदिरा गांधी पुण्यतिथी दिन ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करणार

भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिन’ म्हणून नागपूर महानगरपालिका साजरा करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत महापौर नंदा जिचकार व मनपा आयुक्त अश्विन मुदगल हे दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून विनम्र अभिवादन करतील.