मुंबई – ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वरळी डोम परिसरात बॅनरबाजीचं मोठं सत्र सुरू झालं आहे. या बॅनर्समधून मराठी अस्मितेचा सूर स्पष्टपणे उमटत असून, मुंबईकरांचे लक्ष वेधलं जात आहे.
विविध फलकांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्रित फोटो झळकत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनरवर कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव, चिन्ह नाही, परंतु आशय मात्र खवळलेला आणि ठाम आहे.
एका बॅनरवर झळकणारं वाक्य “जे मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपुरला गेले आहेत, त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या; नाहीतर कायमचे गुजरातला पोहचाल. सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
तर, दुसऱ्या बॅनरवर लिहिलं आहे.सभा झाल्यावर आदेश द्या, महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे.
“आवाज मराठीचा – आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत”, “मराठी एकजुटीचा विजय असो”, आणि “महाराष्ट्रात मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच!” अशा घोषणा असलेले बॅनरही मोठ्या प्रमाणावर झळकत आहेत.
या बॅनरबाजीमुळे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय एकत्र येण्याच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे. यावरून स्पष्ट होते की, हा मेळावा केवळ राजकीय नसून मराठी अस्मितेच्या एकजुटीचा संदेश देणारा ठरणार आहे.