मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “भगवा दहशतवाद” असा बनावट प्रचार करून काँग्रेसने हिंदू समाजाला बदनाम केले. आज न्यायालयाच्या निकालामुळे त्या अपप्रचाराचा पूर्णपणे खंडन झाले असून, काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.
शिंदे म्हणाले की, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात निरपराध हिंदूंना १७ वर्षे खोट्या आरोपांखाली तुरुंगात ठेवण्यात आले. हा केवळ कायद्याचा नव्हे, तर मानवतेचाही मोठा अपमान होता. या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यामुळे हिंदू समाजावरील कलंक धुऊन निघाला आहे. “गर्व से कहो हम हिंदू हैं” ही घोषणा आता अधिक बुलंद आवाजात देशभर घुमेल, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, शिवसेना शिंदे गटाने या सर्व काळात या देशभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती, कारण त्यांचा लढा सत्यासाठी होता. तुरुंगात डांबण्यात आलेल्या सातही व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर अन्याय झाला आणि तो हिंदू समाज विसरणार नाही, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
“हिंदू दहशतवाद” हा शब्द काँग्रेसने राजकीय हेतूने जनतेच्या मनावर लादला होता. त्या बनावटीच्या आरोपांमुळे संपूर्ण हिंदू समाजाला एक खोटा शिक्का बसवण्याचा प्रयत्न झाला. हे काँग्रेसचं षडयंत्र उघडकीस आले असून, त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी माफी मागणं गरजेचं आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, हिंदू धर्म सहिष्णू आहे, पण त्याच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेत भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडण्याचा काँग्रेसचा डाव लोक विसरणार नाहीत. आजचा दिवस हा त्या काळ्याकुट्ट राजकीय षडयंत्राचा शेवट आहे, असंही शिंदे म्हणाले.