मुंबई : “निवडणुका आल्या की काही लोकांना जनतेची आठवण येते, एरव्ही ‘हम दो हमारे दो’ असं चाललेलं असतं,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वरळी येथे शिंदेसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदेसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, “मतं मागण्यासाठी आता हिंदुत्व, मराठी माणूस आठवतो आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मतदार तुमची जागा दाखवूनच राहतील. मराठी माणसाच्या नावाने खोटं गळं काढणाऱ्यांना विचारतो – बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर तुम्ही मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? मुंबईतील मराठी समाजाच्या विस्थापनासाठी तुमचं नाकर्तेपण जबाबदार आहे. हे पाप तुमचंच आहे.”
‘लाडक्या लेकीचे रक्षण’ अभियान-
सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या एका तरुणीच्या घटनेचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी भावनिक अपील केलं. “अशी वृत्ती ठेचून काढण्यासाठी आजपासून ‘लाडक्या लेकीचे रक्षण, हेच शिवसेनेचे वचन’ हे नवे अभियान सुरू करत आहोत. प्रत्येक घरातील सून ही माझी लाडकी बहीण आहे,” असे शिंदे म्हणाले.
ठाकरे आणि गांधी दोघांनाही फटकारलं-
उद्धव ठाकरे यांच्या एका भाषणातील “कम ऑन, किल मी” या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत शिंदे म्हणाले, “हे इंग्लिश पिक्चर बघून आलेत, पण ‘मरे हुए को क्या मारना’ – महाराष्ट्राने तुमचा मुडदा आधीच पाडलेला आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही; त्याला सिंहाचं काळीज लागतं.”
राहुल गांधींनाही खडे बोल-
ऑपरेशन सिंदुरवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींनाही शिंदे यांनी फटकारलं. “गांधींना आपल्या लष्करावर विश्वास नाही, पण पाकिस्तानवर आहे. लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न विचारणं, हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा आहे. तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समारंभात विशेष सत्कार-
या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदुरनंतर भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मुरली देवरा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याशी विशेष मुलाखतही घेण्यात आली.