Published On : Mon, Nov 25th, 2019

विद्युत बचतीची शहानिशा करण्याकरिता ‘थर्ड पार्टी ऑडीट’ करा!

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : केबल व इतर तारा काढण्याबात उपमहापौरांच्या अध्यक्षतेत समिती गठीत

नागपूर : विजेची बचत व्‍हावी यासाठी शहरातील सर्व पथदिवे बदलून त्याऐवजी एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. मात्र नव्या एलईडी विद्युत दिव्यांमुळे विद्युत बचत होते का आणि किती विद्युत बचत होते, याची शहानिशा करण्याकरिता ‘थर्ड पार्टी ऑडीट’ करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

विद्युत विभागासंबंधी प्रश्नांबाबत सोमवारी (ता.२५) महापौर कार्यालयातील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर बोलत होते. बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, उपअभियंता कल्पना मेश्राम, कनिष्ठ अभियंता सर्वश्री दिलीप वंजारी, श्यामसुंदर ढगे, पी.के. रुद्रकार, आर.यू.राठोड, जी.एम.तारापुरे, पी.एन.कालबेंडे, आर.सी.भाजीपाले, पी.एन.खोब्रागडे, सुनील नवघरे आदी उपस्थित होते.

एलएडी विद्युत दिव्यांच्या माध्यमातून होणा-या वीज बचतीची शहानिशा करण्याकरिता ‘थर्ड पार्टी ऑडीट’ करण्यासह लोंबकळणा-या टि.व्‍ही. केबल व इतर तारांबाबत विस्तृत अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी उपमहापौर मनिषा कोठे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी व कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर यांचा समावेश आहे. गठीत समितीद्वारा केबल व इतर तारांच्या संदर्भात आवश्यक अभ्यास करून ५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

शहरात विविध ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. विविध ठिकाणच्या १८ मार्गावरील एमएसईडीसीएल चे विद्युत खांब व विद्युत वाहिन्या स्थानांतरीत करायच्या असून याबाबत अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे हे आढावा घेतील असेही महापौरांनी सांगितले.

शहरात विविध प्रकारची कामे सुरू आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास होउ नये यासाठी कोणतेही काम प्रलंबीत राहू नये याकडे विशेष लक्ष द्या. कामाचा वेग वाढवून विहीत कालावधीमध्ये काम पूर्ण करा. नागरिकांकडून येणा-या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी जबाबदारीने गांभीर्य लक्षात घेउन कार्य करा, असेही निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी अधिका-यांना दिले.