Published On : Thu, Nov 14th, 2019

तिसरे विदर्भस्तरीय ग्रामायण सेवा प्रदर्शन ३ ते ६ जानेवारीदरम्यान

Advertisement

नागपूर महानगरपालिका व ग्रामायण प्रतिष्ठानचे आयोजन

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये तिसरे विदर्भस्तरीय ग्रामायण सेवा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शहरातील वर्धा मार्गावरील शनिवार बाजार मेट्रो स्टेशनच्या बाजूला सीतानगर हॉटेल रेडीसन ब्ल्यू चौक येथे हे प्रदर्शन होणार आहे. ३ ते ६ जानेवारीदरम्यान चारही दिवस दररोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेमध्ये प्रदर्शन सुरू राहणार असून सर्वांना प्रवेश नि:शुल्क आहे.

भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद व श्रीराम मंदिर सेवा समिती हे प्रदर्शनाचे सहआयोजक आहेत. विदर्भातील विशेषत: ग्रामीण भागात काम करणा-या लहान मोठ्या सेवाभावी संस्था, गट आणि कार्यकर्ते यांच्या कार्याचा परिचय नागरिकांना व्‍हावा. त्यातून नागरिकांचे सामाजिक भान वाढावे, त्यांच्या जवळचे कौशल्य अनुभव, शक्ती, बुध्दी, वेळ, पैसा यांचा सहयोग या कामांना मिळून त्यांचे काम बळकट व्हावे, या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. महिला, युवा, शेतकरी, वंचित वर्ग, दिव्यांग अशा समाजपरिवर्तनाच्या विविध पैलूंवर काम करणा-या सर्व सेवाभावी संस्थांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.

मनपातर्फे विविध सुविधा
प्रदर्शनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वच्छता, शुद्ध पाणी आदी मुलभूत सुविधांसह नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाच्या विविध कार्याची माहिती देणारे स्टॉलही प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत.

२५ हजारांवर लोक देणार भेट
चार दिवसीय प्रदर्शनामध्ये सुमारे दीडशे स्टॉल्स राहणार आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी संपूर्ण विदर्भासह मध्य भारतातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रदर्शनाला दरवर्षी मिळणारा प्रतिसादर पाहता दरवर्षी प्रदर्शनाला भेट देणा-यांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी प्रदर्शनाला १५ हजार नागरिकांनी भेट दिली होती. यावर्षी २५ हजारांवर लोक प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास आहे.

विविध स्पर्धा व कार्यशाळा
प्रदर्शनादरम्यान शालेय विद्यार्थी, अभियांत्रिकी विद्यार्थी आणि प्रौढ अशा तीन वयोगटांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक विज्ञान मॉडेल स्पर्धा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ग्रामोपयोगी तंत्रज्ञानाचे मॉडेल स्पर्धा व प्रौढांसाठी टाकाउमधून टिकाउ निर्मिती स्पर्धा अशा तीन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तिन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात विविध कार्यशाळांमध्ये वेळेवर प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी प्रदर्शन पाहायला येणा-यांना यानिमित्ताने मिळणार आहे. प्रदर्शनात एकाच वेळी अनेक विषयांच्या कार्यशाळा सुरू राहतील. पर्यावरणपूरक आणि कलागुणांना वाव देणा-या या कार्यशाळा राहतील.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
यावर्षी प्रदर्शनात दिव्यांग संस्थांचेही स्टॉल्स राहणार आहेत. अंध, अपंग, मुकबधिर, मतिमंद, अनथ अशा पाच प्रकारच्या सेवा संस्थांचा यामध्ये समावेश राहणार असून या संस्थांच्या स्टॉल्ससाठी एक विशेष भाग प्रदर्शनात राहील. याशिवाय पर्यावरणासाठी काम करणा-या संस्था, धार्मीक संस्थांमार्फत करण्यात येणा-या सेवाभावी कामांची माहिती सर्वांपुढे यावी यासाठी विशेष प्रयत्न राहणार आहेत. ग्रामविकास आणि समाज परिवर्तनामध्ये कार्यरत सर्व प्रकारच्या सेवा संस्था, ग्रामीण उद्योजक, महिला बचतगट, कलाकार, ग्रामीण तंत्रज्ञान, यशस्वी उदाहरणे यांनाही प्रदर्शनात संधी दिली जाणार आहे