नागपूर : शहरातील पोलिसांनी “ऑपरेशन थंडर” अंतर्गत नशा विरोधात जनजागृतीसाठी शनिवारी विविध भागांतून भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “Say No to Drugs” या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते आणि नशामुक्त समाजाची शपथही सर्वांनी घेतली.
नागपूर पोलिसांनी काही काळापासून शहरातील ड्रग्सचा प्रसार रोखण्यासाठी “ऑपरेशन थंडर” मोहिमेची सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. अमितेश कुमार सिंगल यांच्या उपस्थितीत पोलिस जिमखाना येथून सुरू झालेली ही रॅली १० किलोमीटर अंतर पार करत वॉकर स्ट्रीट, जपानी गार्डन, जीपीओ चौक, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कमार्गे परत जिमखान्यावर संपली.
या रॅलीत भाजप आमदार आशीष देशमुख यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. नुकत्याच तिरंगा रॅलीदरम्यान त्यांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या रॅलीत त्यांनी नागरिकांना ड्रग्सपासून दूर राहण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
याच दिवशी परिमंडळ क्रमांक चार अंतर्गत डीसीपी रश्मिता राव यांच्या उपस्थितीत बेलतरोडी चौक ते टी-पॉईंट (६.५ किमी) अशी आणखी एक सायकल रॅली पार पडली. मनीष नगर मार्गे जाणाऱ्या या रॅलीत १०० पेक्षा अधिक नागरिक, विद्यार्थी व पोलिस कर्मचारी सहभागी झाले.
या उपक्रमांद्वारे नागपूरमध्ये पोलिस आणि जनतेची एकत्रित जबाबदारी आणि सहभागातून नशामुक्त समाजाच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले गेले आहे. तसेच पोलिस हेल्पलाइनची माहितीही रॅलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.