Published On : Thu, Sep 24th, 2020

कोव्हिड पॉझिटिव्ह आईकडून गर्भातील बाळाला धोका नाही

Advertisement

डॉ. शिवांगी जहागीरदार : ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.समीर जहागीरदार यांनीही केले शंकांचे निरसरन

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत गर्भवतींना जास्त धोका असल्याचे बोलले जाते, मात्र यावर झालेल्या अभ्यासातून गर्भवतींना सर्वसामांन्याप्रमाणेच लक्षणे आढळून येत आहेत. मात्र या काळात गर्भवतींना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नियमीत तपासण्यामधील काही तपासण्या करणे आवश्यक नाही, यासाठी आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे, कुठलाही त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांना फोनवरून माहिती द्यावी. कोव्हिड झालेल्या गर्भवती महिलांची सर्व सुरक्षा बाळगून प्रसूती केली जात आहे. नुकतेच मनपाच्या पाचपावली दवाखान्यात प्रसूती झाली. कोव्हिड हा संसर्गजन्य आजार आहे. तो संसर्गातून पसरतो मात्र आईच्या गर्भातील बाळाला थेट कोव्हिड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक त्या सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’मध्ये गुरूवारी (ता.२४) ‘गर्भावस्था आणि कोव्हिड’ तसेच ‘कोव्हिड काळात घ्यावयाची काळजी’ या विषयावर डॉ. शिवांगी जहागीरदार आणि कन्सल्टन्ट प्लास्टिक सर्जन व आयएमए चे सहसचिव डॉ. समीर जहागीरदार यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

‘गर्भावस्था आणि कोव्हिड’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. शिवांगी जहागीरदार म्हणाल्या, गर्भावस्था ही प्रत्येक स्त्री साठी आणि तिच्या कुटुंबासाठी आनंद आणि काळजी घेण्याची बाब आहे. आजच्या कोव्हिडच्या काळात आनंदापेक्षा काळजीच जास्त वाढली आहे. कोरोनापासून आज बचाव करणे हाच एक पर्यात आहे. त्यामुळे सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबावे. गर्भवती महिलांनी गर्दीत, बाहेर निघू नये. घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास किंवा स्वत: गर्भवती महिला पॉझिटिव्ह असल्यास बाधित व्यक्तीची वेगळी व्यवस्था करावी किंवा गर्भवती महिलेलाच बाधित व्यक्तीपासून किंवा इतरांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी. गर्भवती महिलांची साधारणात: ८ महिने पूर्ण झाल्यानंतर नववा महिना सुरू होताच कोरोना चाचणी केली जाते. त्यापूर्वी जर तिच्या संपर्कातील कुणी पॉझिटिव्ह आल्यास चाचणी करण्यात येते. गर्भावस्थेत होणा-या सर्व तपासण्या अवश्य करण्यात याव्यात. पाचव्या आणि सातव्‍या महिन्यातील चाचण्या कटाक्षाने कराव्यात. प्रसूतीनंतर आईकडून बाळाला स्तनपान करणे अत्यावश्यक आहे. आईला कोरोनाची जास्त लक्षणे असल्यास बाळाला आईचे दुध चमचाने पाजावे, ते शक्य नसल्यास ‘डोनर मिल्क बँक’मधीलही दुध देता येईल, असेही डॉ. शिवांगी जहागीरदार म्हणाल्या.

डॉ. समीर जहागीरदार यांनी प्रारंभी कोव्हिड संदर्भात घ्यावयाची काळजी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. मास्कचा योग्य वापर कसा करावा, तो का आवश्यक आहे, तो न लावल्यास काय दुष्परिणाम होतात, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. “एन ९५” मास्कचा पुनर्वापर करणे टाळावे. एकदा वापल्यानंतर तो कागदी पिशवीत ७२ तास बाजूला ठेवावा. पुनर्वापरासाठी त्रिस्तरीय कापडी मास्कचा वापर करावा. मात्र वापर झाल्यानंतर त्याला किमान अर्धा तास सोडिअम हायपोक्लोराईडच्या १ टक्के मिश्रणात भिजवून ठेवावे. त्यानंतर ७२तास ते उन्हान वाळत ठेवावे व त्यानंतरच त्याचा वापर करावा. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमीत व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. यासंदर्भात काय औषध घ्यायची, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, व्हिटॅमीन सी आणि डी यामध्ये पोषक तत्वे आहेत. या दोन्ही व्हिटॅमीनचे सेवन केल्यानंतर आपले शरीर त्याचे अतिरिक्त जतन करून ठेवत नाही. आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे तेवढेच घेतो आणि उर्वरित लघवीवाटे बाहेर सोडले जाते. उन्हात जास्त फिरणा-यांना व्हिटॅमीन डी ची कमतरता भासत नाही. मात्र आपल्याकडे अनेकांमध्ये ती कमतरता दिसते. त्यामुळे व्हिटॅमीन सी आणि डी सर्वांनीच घ्यावे. झिंकचे औषध प्रमाणात घेणे आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले. आज आपल्या गरजा बदलल्या आहेत. अन्न, वस्त्राप्रमाणेच आज प्रत्येक घरी थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल बी.पी. ऑपरेटर ही सर्व उपकरणे ठेवणे आवश्यक आहेत. सुरक्षेच्या नियमांचे योग्य पालन करा, लक्षणे असल्यास लपवू नका, चाचणी करा, असे आवाहनही डॉ. समीर जहागीरदार यांनी केले.

कोव्हिडमध्ये गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बोलताना डॉ.अनुराधा रिधोरकर यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसरन केले. त्या म्हणाल्या, गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. सुरूवातीला प्रसूतीनंतर बाळाला आईपासून वेगळे ठेवले जायचे. मात्र आता बाळाला आईजवळच ठेवले जाते, ते बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोव्हिड आईच्या दुधातून होत नसला तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणा-या तुषारांमुळे होतो. बाळाला स्तनपान करताना आईने मास्क लावणे अत्यावश्यकच आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही मास्क लावणे गरजेचे आहे. फॅशन म्हणून मास्क वापरू नका, तो गळ्यातला दागिना नाही. आपल्या सुरक्षेचे शस्त्र आहे. त्यामुळे तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची शस्त्रक्रिया या विषयावर बोलताना डॉ. वाय.एस.देशपांडे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येउ शकणा-या शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जातात. शस्त्रक्रिया करताना ऑपरेशन थेटरमध्ये रुग्णाचा डॉक्टर आणि इतर सहायकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांसह ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपले सर्व शरीर सुरक्षित ठेवण्याचे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करताना उपयोगात आणली जाणारी साहित्य, तसेच सुरक्षेच्या सर्व वस्तूंचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांनीही मास्क लावताना उपयोगानंतर त्याची योग्य विल्हेवाटही लावणे आवश्यक आहे. रस्त्यावर वा कुठेही मास्क फेकू नका, जबाबदारीने वागा, असेही आवाहन डॉ.वाय.एस.देशपांडे यांनी केले.

Advertisement
Advertisement