Published On : Wed, Feb 3rd, 2021

मनपा उद्यानात ‘मॉर्निंग वॉक’साठी कोणताही शुल्क नाही !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील फक्त १५ मोठ्या उद्यानांमध्ये जास्तीत-जास्त पाच रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. आरोग्याप्रति जागरुक आणि आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. मनपाच्या उर्वरीत ५४ उद्यानांमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क लावण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

श्री. शर्मा यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात सकाळी नऊपर्यंत ‘मॉर्निंग वॉक’साठी येणा-या नागरिकांना या शुल्कातून सुट देण्यात आली आहे. उद्यान संचालित करणाऱ्या संस्थेला हे ठरवायचे आहे की उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क घ्यायचे किंवा नाही. तीन वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी कुठलेही प्रवेश शुल्क राहणार नाही.

उद्यानाची निगा (राखण) योग्य प्रकारे राखली जात नाही, तिथे गार्ड किंवा माळी राहत नाही. शौचालयाची साफ-सफाई योग्य प्रकारे केली जात नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच उद्यानात येणाऱ्या नागरिकांना योग्य वातावरण मिळाले पाहिजे या कारणाने मनपाने उद्यानांचे संचालन करण्यासाठी खाजगी संस्थांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर ही संस्था त्या भागाची रेसीडेंट वेलफेयर असोसिएशन असली तर त्यांना उद्याने लोकसहभागातून देण्याकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याचा लाभ असा होईल की ते काळजीपूर्वक उद्यानाची देखभाल करु शकतील.

श्री. शर्मा यांनी सांगितले की, उद्यानाचे खाजगीकरण करण्याचा मनपाचा उद्देश नाही. हा प्रयत्न मनपाची जास्तीत-जास्त उद्याने लोकसहभागातून देखभाल व संचालित करण्याचा आहे. मनपाचे १५ उद्याने दोन एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळाची आहेत. ५४ उद्याने ०.५ एकरापासून २ एकर क्षेत्रफळाची आहेत. ०.५ एकरापासून लहान उद्यान नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे.

या उद्यानांसाठी सुरक्षा व्यवस्था व कर्मचा-यांची व्यवस्था संस्थांना करावयाची आहे. सद्य:स्थितीत उद्यानांमध्ये मुलांसाठी असलेल्या साहित्याची देखभाल व रंगरंगोटी होईल. नागरिक विनामूल्य त्याचा वापर करु शकतील. संस्थांना नर्सरी तयार करुन फुलझाडांची विक्री करण्याचा अधिकार राहील. जवळपासच्या नागरिकांना माफक दरात फुलझाडांची उपलब्धता होऊ शकेल. यासोबत खाद्य पदार्थांची विक्री व अम्युझमेंट राईडसची परवानगी संस्थांना राहील. याचा लाभ स्थानीय नागरिकांना होईल आणि त्यांची मुले या अम्युझमेंट राईडसचा आनंद घेऊ शकतील.

नागरिकांना सामाजिक व सांस्कृतिक, स्नेह मिलन व कौटुंबिक कार्यक्रमासाठी लॉन उपलब्ध करता येईल. दिवाळी पहाट किंवा अन्य प्रकारच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद स्थानिक नागरिक घेऊ शकतील. वाचनाची आवड असणा-या नागरिकांसाठी वाचनालय उघडता येईल, स्वच्छतागृहाची योग्यप्रकारे देखभाल होईल. मनपा तर्फे संस्थेला वाहनतळ शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

श्री. शर्मा यांनी सांगितले की, स्थानिक लोकांचा सहभाग वाढवल्यामुळे उद्यानाच्या परिसरात असामाजिक तत्वांचा वावर कमी होईल. बगीच्यात सी.सी.टी.व्ही. पण लावण्याची जबाबदारी संस्थांची राहील. उद्यानातील लहान मुलांची खेळणी व ग्रीन जीम साहित्य ईत्यादी साहित्य नागरिकांना सुस्थितीत वापरण्यास मिळतील. तसेच नागरिकांना सदैव शुध्द व थंड पाण्यासाठी वॉटर कूलर व वॉटर फिल्टरची व्यवस्था उपलब्ध होईल. लहान मुलांच्या विविध शालेय स्पर्धा (१२ वर्षाखालील मुलांकरीता) घेण्याची परवानगी राहील.

यासाठी संचालन समिती तयार करण्यात येईल ज्याचात ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक यांचा सहभाग राहील. तसेच संस्थाचा प्रत्येकी सहा महिन्यात अहवाल तयार करुन स्थायी समितीपुढे ठेवला जाईल.

नागरिकांसाठी नागपुरात २०० उद्याने आहे. याचातून फक्त १५ उद्यानांवर ५ रु शुल्क (मॉर्निंग वॉक सोडून) लावण्याची परवानगी देण्यात येत आहे. नागरिकांना या प्रयत्नाला सहकार्य करावा, असे आवाहन श्री. शर्मा यांनी केले आहे.