Published On : Thu, Aug 29th, 2019

सत्तापदाच्या एका तुकड्यासाठी लाचार होतायत- पाटील

– सातारमध्ये राष्ट्रवादीची विराट सभा

सातारा: ज्यांना लढण्याची ताकद नाही… हिम्मत नाही ते पक्ष बदलत आहेत सत्तापदाच्या एका तुकड्यासाठी लाचार होतायेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सातारच्या जाहीर सभेत केली.दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांचं नाव घेवून तर उदयनराजे यांचे नाव न घेता प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवार यांच्या छायेत राहून लाल दिवा मिळाला ते सोडून गेले आहेत. वीक पॉईंटवर बोट ठेवून भाजप प्रवेश करुन घेत आहेत असा आरोप जयंत पाटील यांनी केला. सातारकरांना काटा जरी टोचला तरी वडीलांसारखे धावून येतात ते शरद पवार.शिवेंद्रसिंहराजे यांना वडीलांसारखं प्रेम दिलं मात्र ते प्रेम विसरले. आता एक गेला म्हणून दुसर्‍यानेही विचार करावा काय म्हणावं या छत्रपतींना असा सवाल करतानाच जे जाण्याचा विचार करत आहेत त्यांना सुबुद्धी देवो असा जबरदस्त टोलाही आमदार जयंत पाटील यांनी लगावला.

दु:ख वाटते एवढी मोठी माणसं पक्ष सोडून जातात परंतु तसा आनंदही होतो कारण पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात कुठेही भाजप शिवसेनेचे वातावरण दिसत नाही. वातावरण फक्त शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिसत आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पुन्हा ताकदीने उभा राहणार त्यासाठी तरुणांची साथ मिळणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांचा खरा इतिहास कुणी सांगितला असेल तर अमोल कोल्हे यांनी असे जयंत पाटील यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जनजागरण करण्याचे काम आम्ही करत आहोत असे जयंत पाटील म्हणाले. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही राहिल हे जमलेल्या विराट जनसमुदायाच्या साक्षीने लक्षात येते. छत्रपतींचे नाव घेवून वावरत आहेत त्यांना या सभेने धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातारा येथील जाहीर सभेत व्यक्त केला.

महाराष्ट्राचे ‘राजेपण’ कालपण… आजपण आणि उदयापण आपण एकाच व्यक्तीला देतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना असा जबरदस्त आत्मविश्वास तरुणांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्माण केला. इतिहासात संभाजी राजाच्या काळात अनाजीपंतांने संभाजीच्या विरोधात कुरघोडी केली होती मात्र ती कुरघोडी मोडून काढली होती तीच पुनरावृत्ती होणार आहे असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

लोकसभेला जे झाले ते विधानसभेला घडणार नाही हे तरुणांनो लक्ष देवून ऐका असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. सातारा शहरातील सगळेच्या सगळे आमदार निवडून देण्याची ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली. हदयात फक्त शरद पवार ठेवा. जो लोकनेता लोकांमध्ये सतत राहतो त्यामुळे आता इतिहास घडवुया सातारची जनता काय करू शकते हे दाखवून देवुया असे आवाहनही आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

या सभेत प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनीही आपले विचार मांडले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा दहावा दिवस असून शेवटची विराट सभा सातारा शहरात पार पडली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष सुनिल माने आदींसह पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.