मुंबई: लाडकी बहिण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळाले
सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र अद्यापही जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले नसल्याने योजना बंद होते की काय अशा चर्चा सुरू आहेत.अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
जानेवारी महिना संपत आला तरी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. मात्र गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.ज्या महिलांचे महिन्याचे उत्पन्न 20 ते 21 हजारांपेक्षा अधिक आहे.त्या महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे सांगितले पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
‘लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जातील. या योजनेसाठी दोन दिवसांपूर्वीच 3 हजार 700 कोटी रुपयांचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेपासून बहिणींच्या अकाऊंटला पैसे येतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.