Published On : Wed, Aug 21st, 2019

..तर ईशान्येतील राज्यांचीही काश्मीरसारखीच स्थिती असती : मोहन भागवत

Advertisement

नागपूर : ईशान्येकडील राज्य भारतासोबत राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असे. आसाम, अरुणाचल प्रदेशमधील स्थिती काश्मीरसारखी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र ५० वर्षांअगोदर काही लोक सेवाभाव घेऊन तेथे गेले. त्यामुळे आत्मियता व जिव्हाळा वाढीस लागला. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नंदकुमार जोशी यांच्या शुभारंभ या पुस्तकाचे सरसंघचालकांच्या मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

रामनगरातील शक्तिपीठ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक शुभांगी भडभडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव असून तो प्रदेश आपला आहे. परंतु, चीन वेळोवेळी त्यावर आपला दावा ठोकण्यासाठी तिथल्या लोकांना प्रलोभने दाखवित असतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जागरूक लोक राहतात असा समज आहे. परंतु, ज्यावेळी ईशान्येकडील राज्यांचे लोक दिल्लीला येतात त्यावेळी त्यांना तुम्ही चीनमधून आलात का, असे विचारले जाते. आपण क्षणभर विचार केला पाहिजे की, असल्या प्रश्नामुळे ईशान्येकडील लोकांना काय वाटत असेल.

परस्परांशी असलेला संपर्काचा अभाव हे भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. अरूणाचलसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सोईसुविधांचा अभाव आहे. तिथले लोक मागास असून कुत्रे-मांजर खातात, असे म्हटले जाते. परंतु, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन आणि परिस्थिती हा त्यांचा नव्हे आपला दोष आहे. विकासचक्रात त्यांचे मागे राहणे याला देशातील इतर भागात राहणारे लोक जबाबदार असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक नंदकुमार जोशी यांनी अरुणाचल प्रदेशातील वास्तव्याचे अनुभव मांडले. प्रसाद बर्वे यांनी संचालन केले.

‘तेथील’ क्रांतिकारकांची नावे अभ्यासक्रमात नाहीत
यावेळी सरसंघचालकांनी ईशान्येतील राज्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंती व्यक्त केली. पारतंत्र्याच्या काळात देशाच्या इतर भागाप्रमाणे पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील स्वातंत्र्यासाठी आंदोलने व संघर्ष झाला. परंतु, तेथील क्रांतिकारकांची नावे, कर्तृत्व आणि कथा त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिल्यात. आम्हाला त्या अभ्यासक्रमात कधीच शिकवल्या नाहीत, असे ते म्हणाले.