नागपूर : नागपूर शहरातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची मोठी घटना घडली आहे. लोनारा येथील मोरया पार्क येथे राहणाऱ्या सौरभ कृष्णपदी बसु यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घर फोडून साडे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना १ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत घडल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसु हे आपल्या कुटुंबासह लेडीज क्लब, नागपूर येथे दुर्गापूजा कार्यक्रमासाठी गेले होते. घराला कुलूप लावून ते रात्री उशिरा परतले असता, घराच्या खिडकीचे ग्रील तोडलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तातडीने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता, चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने, रोकड व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण २ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले.
चोरी गेलेला मुद्देमाल :
- सोन्याचे कंगन, नेकलेस, चेन, चॉकर व ब्रेसलेट (एकूण अंदाजे २ लाख रुपये किमतीचे)
- पिगी बँकेत ठेवलेले अंदाजे २ हजार रुपये
- घरातील सीसीटीव्ही एनव्हीआर, स्विच आणि कॅमेरे (किंमत सुमारे ५५ हजार रुपये)
या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ३७५/२०२५ नोंदविण्यात आला असून, कलम ३३१(४) व ३०५(अ) भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक पोपट बाबन धायटोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, शेजारील भागातील हालचाली व तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.नागपूरमध्ये सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घरफोडीने परिसरात खळबळ उडाली आहे.