नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंग्सवे हॉस्पिटलबाहेर उभी असलेल्या कारची काच फोडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट-2 ने ही कारवाई करत चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील मितेश रहांगडाले हे त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत मानेवाडा येथील एका सराफा दुकानातून सुमारे 37 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार खरेदी करून परतत होते. या हाराची किंमत सुमारे 4 लाख 50 हजार रुपये होती. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडिलांची भेट घेण्यासाठी ते किंग्सवे हॉस्पिटलमध्ये गेले आणि कार बाहेर पार्क करून आत गेले.
सुमारे अर्ध्या तासानंतर परत आल्यानंतर कारच्या मागील बाजूची काच फुटलेली आढळली. कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या रंगाची बॅग गायब होती. या बॅगेत नव्याने खरेदी केलेला सोन्याचा हार ठेवण्यात आला होता. घटनेची तक्रार मिळताच सदर पोलिसांसह क्राईम ब्रँच युनिट-2 ने तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 28 वर्षीय जैन अली रिजवान अली बंदाली (रा. राजुरा, जि. चंद्रपूर) याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला सोन्याचा हार, एक मोपेड आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5 लाख 5 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.





