Published On : Sat, Dec 30th, 2017

युवा पिढीला आधुनिक शिक्षणासोबतच राष्ट्रीयत्वाचे संस्कार गरजेचे : मुख्यमंत्री

Advertisement

मुंबई: : लोकमान्य टिळकांनी दिलेला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या घोषणेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलण्यासह जुलमी ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागवला, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जगातील सर्वाधिक युवा असलेला देश म्हणून सिद्ध होत असलेल्या भारतातील युवा पिढीला आधुनिक शिक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच राष्ट्रीयत्वाचे संस्कारही दिले पाहिजेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

लखनौ येथे 29 डिसेंबर 1916 रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा केली होती. या घटनेला 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे आज आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, संसदीय कार्य व नगर विकास मंत्री सुरेशकुमार खन्ना, महिला कल्याण आणि पर्यटनमंत्री श्रीमती रिता बहुगुणा-जोशी, विधि व क्रीडा राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी तसेच पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक यांच्यासह उत्तर प्रदेशचे विविध मंत्री, खासदार, आमदार तसेच स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, त्यांचे कुटुंबीयदेखील यावेळी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या मंगल पांडे, तात्या टोपे, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यासह इतर सेनानींच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री. फडणवीस म्हणाले, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी भारतात जुलमी पद्धतीने राजवट चालवून देशवासियांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न केला. मात्र, लोकमान्यांच्या स्वराज्याच्या घोषणेने देशामध्ये ऊर्जा जागवण्यासह इंग्रजांना पराभूत करण्याचा विश्वास जागवला.

इतिहास लक्षात न ठेवणारे भविष्य घडवू शकत नाहीत. विश्वातून संपलेल्या अनेक संस्कृती व देश याची साक्ष देतात, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारत आज संक्रमणावस्थेतून जातो आहे. येत्या काळात संपूर्ण जगाला प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा भारत करेल. युवा शक्तीचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होत असताना युवा पिढीला निव्वळ आधुनिक शिक्षण व प्रगत तंत्रज्ञान देऊन चालणार नाही. त्यासोबत या पिढीला संस्कार, राष्ट्रीयत्व शिकवले पाहिजे. त्यांना शहिदांचे बलिदान आणि स्वातंत्र्य सेनानींचा कारावास देखील ठाऊक हवा. भारतीयांनी परक्या देशांवर आक्रमणे केली नाहीत मात्र, जगाला ज्ञान व संस्कार दिले. याच माध्यमातून नवभारताचा संकल्प सिद्धीस नेण्याचे कार्य युवा पिढीने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकमान्य टिळक यांच्या विचारांवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या विचार व कार्यांवर आधारित वक्तृत्व आणि गायन स्पर्धेतील विजेत्यांनी देखील यावेळी सादरीकरण केले. त्यांच्या कलागुणांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला अनुसरुन कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश दरम्यान एका सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत सहकार्य समाविष्ट आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरील एका चित्रप्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. दरम्यान, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची लखनौ येथील राजभवनात भेट घेतली. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा उपस्थित होते.