Published On : Tue, Jan 9th, 2018

ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ‘ग्राहक योद्धे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई: ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आज ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यांवर कार्य होत आहे, ग्राहकांच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या ग्राहक योद्धयांच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळत असतो. बाजारातल्या बदलांचा परिणाम हा ग्राहकांवरही होत आहे. थेट मार्केटिंग , ऑनलाईन मार्केटिंग या क्षेत्रात होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी प्रबोधन करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी, ग्राहक हा राजा मानून त्याची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व स्तरावरून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रिय व्हावे असेही त्यांनी सांगितले.

या वर्षाच्या ग्राहक संरक्षणाची थीम,” Emerging Digital Markets : Issues & Challenges in Consumer Protection” अशी आहे. टेक्नॉलॉजी प्रगत होत असल्याने ती समजून घेऊन स्मार्ट बनणे ही काळाची गरज आहे. ऑनलाईन खरेदी करताना, सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक असून आज या प्रदर्शनात सायबर पोलीस यांच्यातर्फेही एक स्टॉल लावण्यात आला होता.

दुकानदारामार्फत खरेदी न करता डायरेक्ट सेलिंगने ग्राहकांची फसवणूक होण्याच्या तक्रारी वाढल्याने ग्राहक संरक्षण विभागातर्फे एक पोर्टल तयार करण्याची योजना आहे. याकरिता इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन शासनास मदत करत आहेत.

ग्राहकांना ताकद देण्यासाठी विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. संगणकीकृत पॉस मशिनद्वारे आधार ओळख, द्वारपोच योजना याबरोबरच वजनमापे विभागाचे संगणकीकरण, ग्राहक मंचाकडे तक्रारीसाठी संगणकीकृत यंत्रणा, सेवाहक्क कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त सेवा, परवाने ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुरुवात झालेली असून रेशनकार्ड, अन्न औषध प्रशासनातील परवाने ऑनलाईन देण्यात येत आहेत.

नवीन ग्राहक संरक्षण 2018 चे जे विधेयक लोकसभेत सादर झाले आहे त्यात देखील ग्राहक संरक्षणाच्या बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, यु.एन.गाईड लाईन्स इ.चा विचार करण्यात आलेला आहे.

गेल्या महिन्यात एक केंद्रीय ग्राहक संरक्षण ॲथोरिटीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नवीन कायद्यामध्ये नमूद असलेल्या महत्त्वाच्या बाबींमध्ये ग्राहकांना भुलवणाऱ्या व खोट्या जाहिराती करणाऱ्या कंपनी आणि या जाहिरातीत काम करणारे सेलेब्रिटी यांच्यावर कारवाईची तरतूद आहे. तसेच अन्न भेसळीने इजा झाल्यास कठोर कारवाई, दंड,कारावास अशा शिक्षांची तरतूद आहे. तसेच ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास कुठेही ई-तक्रार करता येणार आहे.

आज या प्रदर्शनात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, वैधमापन विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग,अन्न व औषध प्रशासन विभाग, एमटीएनएल, बेस्ट,पेट्रोलियम कंपन्या,सायबर पोलीस,ग्राहक मंच,ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इन सोलूशन कंपनी, कंन्झुमर्स गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया इ.नी आपले स्टॉल लावून शासनाच्या ग्राहक जागृतीच्या अभियानात भाग घेतला.