Published On : Mon, Apr 5th, 2021

स्मार्ट सिटीचे काम प्रशंसनीय : महापौर

Advertisement

एडवायजरी फोरमची बैठक संपन्न

नागपूर : कोरोनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्यात आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची सूचना पोलिसांना देण्यामधे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. स्मार्ट सिटीचे काम प्रशंसनीय आहे, या शब्दात महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी आपली भावना व्यक्त केली.

स्मार्ट सिटी एडवायजरी फोरमची बैठक नुकतीच स्मार्ट सिटीच्या सभाकक्षात पार पडली. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत संपन्न बैठकीमध्ये राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस.(IAS) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यावेळी उपस्थित होते.

डॉ. शील घुले, महाव्यवस्थापक, ई-गर्व्हनेंस विभाग, नागपूर स्मार्ट सिटी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या वतीने नि:शुल्क वाई-फाई ची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याचा लाभ मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये झाला. स्मार्ट सिटीच्या वतीने कोव्हिड रुग्णांसाठी डॅशबोर्ड ची व्यवस्था करण्यात आली होती. महापौरांनी नाईट विजन कॅमरा लावण्याची सूचना केली. तसेच दाटी-वाटीच्या क्षेत्रात स्मार्ट पार्किंग ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर वाहने पार्किंग करणे बंद केले पाहिजे आणि पादचा-यांची जागा मोकळी ठेवायला पाहिजे.

श्रीमती भुवनेश्वरी एस. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, ही बाब नागपूरसाठी अभिमानास्पद आहे की “नरचरिंग नेबरहुड चॅलेंज” मध्ये संपूर्ण सहाराष्ट्रातून नागपूर ची निवड केन्द्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने केली आहे. त्यांनी पुढे स्ट्रीटस फॉर पीपल उपक्रमाबद्दल माहिती फोरम ला दिली. स्मार्ट सिटी च्या वतीने प्रभाग ३० नेहरुनगर झोन मध्ये ५ उपक्रम हाती घेण्यात आले आहे. याचा लाभ लहान मुलांना आणि त्यांचा परिवाराला होईल. या उपक्रमाचा उददेश रस्त्याला पादचा-यांसाठी सुरक्षित लहान मुलांसाठी खेळणेयोग्य बनवायचे आहे, ही माहिती डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमाने दिली.

महापौरांनी आमदार श्री. मोहन मते आणि आमदार श्री. अभिजीत वंजारी यांची या कामात मदत घेण्याचे आवाहन केले. डॉ. उमरेडकर यांनी सीताबर्डी बाजारपेठ आणि सक्करदरा तलावाजवळ घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. क्षेत्राधिष्ठित विकास कार्यक्रम अंतर्गत भरतवाडा, पुनापुर, पारडी आणि भांडेवाडी क्षेत्रात सुरु असलेल्या ‍विकास कामाची फोरम ला माहिती देण्यात आली. या क्षेत्राचा विकास प्रारुप राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने कामाची गती सुध्दा कमी आहे. बैठकीत तेजेंदर सिंह रेणु, अध्यक्ष, नागपूर रेसीडेंसिएल होटल असोसिएशन, लीना बुधे, सेंटर फार सस्टेनेबल डेव्हलपमेंट, विवेक रानडे, सिव्हील एक्शन ग्रुप, कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजील फाऊंडेशन, डॉ. प्रशांत डायगव्हाणे, डीन सिविल इंजीनियरिंग विभाग, भानुप्रिया ठाकुर, कंपनी सचिव, नेहा झा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, राजेश दुफारे महाव्यवस्थापक (मोबिलिटी) व राहुल पांडे, मुख्य योजनाकार आदी उपस्थित होते.