Published On : Sun, Sep 26th, 2021

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : महापौर दयाशंकर तिवारी

सीताबर्डी येथे महापौर नेत्र तपासणी शिबिर

नागपूर : आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती. प. दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. शनिवारी (ता. २५) प. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने सीताबर्डी येथील भिडे गर्ल्स हायस्कूल येथे निःशुल्क महापौर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार, नासुप्रचे विश्वस्त ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, मनपाचे अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, प. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या आधारावर पंतप्रधानांनी अनेक योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने मनपा ‘आझादी-७५’ अंतर्गत नागपूर शहरामध्ये ७५ नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. त्याअंतर्गत शनिवारी प्रभाग १५ मधील सीताबर्डी येथील भिडे गर्ल्स हायस्कूल येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ७५ नेत्र तपासणी शिबीर, ७५ दंत तपासणी शिबीर आणि १०७ आरोग्य तपासणी शिबीर आशा एकूण २५७ शिबिराचे करण्यात येत आहे, या सर्व शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. तसेच महापौरांनी प. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्या दिल्या.

शिबिरामध्ये महात्मे नेत्रपिढीच्या डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.