Published On : Tue, Jun 26th, 2018

भाउसाहेबांच्या कार्याकडे विदर्भातील साहित्यिकांनी दुर्लक्ष केले

Advertisement

नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहिती नाही, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.

आकांक्षा प्रकाशन व महात्मे-पालोरकर परिवाराच्यावतीने लेखक प्रा. बाळकृष्ण महात्मे लिखित ‘सूर्यावर वादळे उठतात’ या नाट्यपुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार जगन वंजारी, मनोहर वानखेडे, डॉ. अरुणा सबाने, डॉ. वंदना महात्मे, निर्मला महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते. भाऊसाहेबांसारख्या महनीय व्यक्तिबाबत वैदर्भीय लेखकांनी दुर्लक्ष केले, हे दुर्दैव आहे़ अशा पार्श्वभूमीवर प्रा़ बा. द़ महात्मे यांच्या नाट्यपुस्तकातील वादळरुपी प्रसंगांतून भाउसाहेबांचा इतिहास प्रकाशात आला. बहुजनांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरणारे असून यातून नव्या पिढीला भाउसाहेबांचे मोठेपण कळेल, असे कौतुकस्वर डॉ. तायवाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी जगन वंजारी यांनीही डॉ. पंजाबराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. भाउसाहेबांनी वेदावर डिलीट ही पदवी प्राप्त केली होती. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात कुसुमावती देशपांडे यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त केल्यानंतर ब्राम्हण महिलेला निवडल्यावरून त्यांना प्रश्न केले जायचे. त्यावेळी वेदांचा अभ्यास केलेले भाउसाहेब प्रश्नकर्त्यांना, या देशातील कोणत्याच समाजातील स्त्रीला कधी अधिकार मिळाले नाहीत, त्यामुळे कोणतीच स्त्री ब्राम्हण नसून सर्व स्त्रिया शुद्रच आहेत,असे ठामपणे उत्तर देत असल्याची आठवण वंजारी यांनी सांगितली.

यावेळी मनोहर वानखेडे यांनी प्रा. बा.द. महात्मे यांच्या स्मृतींना उजाळा दिला़ शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरीला असताना त्यांचे अनेकदा वाद झाले़, तरीही भाऊसाहेबांविषयीची त्यांची निष्ठा तिळमात्र कमी झाली नाही. प्रा. महात्मे यांचे विचार या नाट्यपुस्तकाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचतील, ही भावना वानखेडे यांनी व्यक्त केली.

बाबांनी लिहिलेल्या या नाटीकेला रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे १५ वषार्पूर्वी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे त्यांची मुलगी वंदना महात्मे यांनी सांगितले़ प्रा. महात्मे यांनी लिहलेल्या पंजाबराव देशमुखांवरील या नाटकाला सादरीकरणाची क्षमता निर्माण करून रंगमंचावर सादर करण्यात यावे, अशी ईच्छा गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक अरुणा सबाने यांनी केले़ संचालन चारुशिला महात्मे यांनी केले़ गजानन पालोरकर यांनी आभार मानले.