Published On : Sat, May 30th, 2020

दीड वर्षाच्या चिमुकल्याला वाºयावर सोडून महिला फरार

– अपहरण करून आणल्याची शक्यता
– बाल संरक्षण कक्षाने मुलाला घेतले ताब्यात

नागपूर: शहरातील रामझुल्याखालील परिसर भटक्या जमातीच्या लोकांसाठी निवारा ठरला आहे. येथे अनेक मुले बेवारस फिरत असतात. याच रामझुल्याखाली दीड वर्षाचा एक मुलगा कचºयाच्या ढिगाºयावर खेळत होता. हा मुलगा दीड महिन्यांपूर्वी अकोल्यावरून एका महिलेने रेल्वे पुलाखाली आणून सोडला आणि ती महिला फरार झाली. या मुलाबाबत माहिती मिळताच महिला व बाल कल्याण विभागाकडून मुलाला ताब्यात घेऊन त्या दीड वर्षाच्या चिमुकल्याची शिशुगृहात रवानगी करण्यात आली. या मुलाला अकोल्यावरून अपहरण करून आणले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, अद्याप एकाही पालकाने मुलाची चौकशी न केल्याने पोलिस जिल्हानिहाय मिसिंग मुलांची यादी शोधत आहेत. फरार महिलेचाही पोलिस शोध घेत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात मजुरांचे स्थलांतरण मोठ्याप्रमाणात झाले. याचाच फायदा घेऊन या मुलाचे अपहरण झाले असावे, अशी शंकाही पोलिसांना आहे. याचा शोध आता घेतला जात आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या सचिव रेखा बाराहाते व उपाय संस्थेच्या भारती सायरकर यांना हे मुल रामझुल्याखाली बेवारस स्थितीत आढळले. त्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांना कळविले. कोल्हे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना घटनास्थळी जावून चौकशीचे आदेश दिले. पठाण घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना दीड वर्षाचा मुलगा कचराकुंडित खेळत असल्याचे आढळले.

त्यांनी पुलाखाली राहणाºयांना विचारणा केली असता दीड महिन्यापूर्वी एक महिला त्याला सोडून चंद्रपूरला निघून गेली होती. हे मुल तिने अकोला येथून आणले असे सांगितले. ते बेवारस मुल एका वृद्ध महिलेसोबत राहत होते. मुलगा बेवारस असल्याचे लक्षात येताच पठाण यांनी घटनेची तक्रार गणेशपेठ पोलिसांना दिली. मुलाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर त्या बेवारस मुलाला शिशुगृहात निवारा मिळवून देण्यात आला.

सदर घटनेबाबत केलेल्या प्रथम दर्शनीय चौकशीत मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्याने लेखी तक्रार पोलिसात करण्यात आली. गणेशपेठ पोलिस त्या महिलेने हे मुल कुठुन आणले याचा तपास करीत आहेत. सदर कारवाईत चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे व मोनाली पोहणकर यांनी सहकार्य केले. काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुले-मुली तसेच बेवारस आढळलेली मुले-मुली दिसल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष नागपूर यांना ०७१२-२५६९९९१ तसेच चाईल्ड लाईन १०९८ यावर क्रमांकावर सूचना द्यावात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागाने केले आहे.