Published On : Fri, Feb 26th, 2021

दिव्यांगाच्या कल्याणकारी कार्याला मिळणार गती

राखीव निधीच्या संपूर्ण निधी खर्चाबाबत महापौरांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय


नागपूर : नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध कल्याणकारी कार्याला गती मिळावी यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये ७.५० कोटी रूपये निधीचे प्रावधान करण्यात आले आहे. या राखीव निधीचे पूर्णपणे योग्य पदासाठी खर्च करण्याच्या नियोजनाच्या कार्यवाहीला गती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला.

यासंदर्भात गठीत समितीची महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (ता.२६) बैठक घेण्यात आली. बैठकीत समितीचे सदस्य व दिव्यांग प्रतिनिधी नगरसेवक दिनेश यादव, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, मनपा समाजकल्याण अधिकारी दिनकर उमरेडकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींना मनपातर्फे ट्रायसिकल देण्यात येतात. यापूर्वी कानपूर येथील कंपनीद्वारे निर्मित ट्रायसिकल देण्यात आलेल्या आहेत. मात्र या ट्रायसिकलबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे महापौरांनी बैठकीत नमूद केले. यापूर्वी दिल्या जाणा-या ट्रायसिकलचे सर्व्हीस सेंटर कानपूरला असल्याने दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यावर उपाय म्हणून यावेळी नागपूरातील कंपन्यांनाच या ट्रायसिकलसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपन्यांचे शहर हद्दीत सर्व्हीस सेंटर आहे, त्यांनाच प्राधान्य देण्याचे महापौरांनी निर्देशित केले. ट्रायसिकलसाठी शहरातील किमान तीन कंपन्यांना नियुक्त केले जाईल. या ट्रायसिकल घेण्यापूर्वी दिव्यांग बांधव त्याची पाहणी करतील व त्यांना जे योग्य वाटेल ते खरेदी करण्यास मनपा सहकार्य करणार आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले.

कर्णबधिर दिव्यांग बांधवांच्या शस्त्रक्रियेसाठी २५ लक्ष रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय समग्र शिक्षा अभियानांतर्गत मनपाच्या शाळेत शिकणा-या १२व्या वर्गापर्यंतच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारीही मनपाने स्वीकारली आहे. त्याचे नियोजन केंद्राच्या निधीतून केले जाणार आहे.

दिव्यांग बांधवांना शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० लक्ष रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध गटासाठी आवश्यक अत्याधुनिक साधन सामुग्रीसाठी २ कोटी रुपयांचे नियोजन करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या २.५० लक्ष रुपयांसह मनपा ५० हजार रुपये अर्थसहाय्य करणार आहे. दिव्यांग बांधवांना व्यवसायाकरिता ५ टक्के दुकान, ओटे, गाळे मिळावेत यासंदर्भात धोरण निश्चित नव्हते. यावर गांभीर्याने दखल घेत महापौरांनी गठई कामगारांना देण्यात येणा-या स्टॉलच्या धोरणानुसार दिव्यांगांनाही लाभ देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

दिव्यांग खेळाडूंसाठी गुरूगोविंदसिंग स्टेडियम
शहरातील दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी जागा मैदान उपलब्ध नसल्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महत्वाचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. उत्तर नागपुरातील गुरूगोविंदसिंग स्टेडियम दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय या स्टेडियममध्ये विविध खेळांचा सराव करणा-या खेळाडूंसाठी आवश्यक साहित्यांची व्यवस्था मनपा करणार आहे. विशेष म्हणजे शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तथा राज्यातील एकमेव अर्जुन क्रीडा पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांचे नाव गुरुगोविंदसिंग स्टेडियममधील जीमला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला आहे. राज्य, राष्ट्रीय, पॅरा ऑलिम्पिक, आशियाई, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना ७५ टक्के खर्च दिला जाणार आहे.

दिव्यांगांच्या दुकानांचे होणार सर्वे
शहरात दिव्यांग बांधवांच्या नावाने अवैधरित्या दुकाने व व्यवसाय सुरू असल्याची तक्रार बैठकीत मांडण्यात आली. यासंदर्भात मनपाच्या समाजकल्याण विभागाचे समुपदेशक सर्वे करून सर्व दुकानदारांना त्यांच्या वैधतेबाबत शपथपत्र दाखल करायला लावणार आहेत. यामध्ये बनावट, अवैधरित्या व्यवसाय करणा-यांची पोलिस तक्रार केली जाणार आहे.

शासनाच्या विविध विभाग व योजनेद्वारे लाभ घेणा-या दिव्यांना पुन्हा उपरोक्त योजनांचा लाभ घेता येउ नये यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांची यादी मागविण्याचे महापौरांनी निर्देशित केले. याशिवाय चिंधी कामगारांना व्यवसायासाठी हक्काची एका ठिकाणी जागा मिळावी, याबाबतही कार्यवाही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले आहेत.