Published On : Fri, Feb 26th, 2021

कार्यालय, लॉन बुकिंगचे पैसे परत मिळतील याची काळजी घ्या

महापौरांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभ मंगल कार्यालय, लॉनमध्ये आयोजित करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहे. परंतु हे कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे नागरिकांनी ॲडव्हान्स देऊन त्याची बुकिंग केली आहे. ती बुकिंगची रक्कम मंगल कार्यालय, लॉन मालकांकडून परत मिळेल, याची व्यवस्था करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले.

नागपूर महानगरपालिका प्रशासनाने २५ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यानच्या समारंभावर निर्बंध लादले आहे. लग्न समारंभ मंगल कार्यालय अथवा लॉनमध्ये न करता घरीच ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी दिली आहे. परंतु नागरिकांनी या पूर्वनियोजित समारंभासाठी मंगल कार्यालये, लॉन पूर्वीच बुक केल्याने अनामत रक्कम परत मिळेल की नाही, या विवंचनेत ते आहेत.

यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेऊन तशी व्यवस्था करून द्यावी, असे महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.