Published On : Thu, Feb 6th, 2020

राज्यातील सुतगिरण्या सक्षमपणे सुरू राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार – ऊर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत

Advertisement

राज्यातील सुतगिरण्या सक्षमपणे सुरू राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर व्हावा यादृष्टीने उपाय योजना आखण्यात येणार असून, वीजनिर्मीती करणा-या कारखान्यांना वीजदरात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी दिली.

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकारी सुतगिरण्यांना देय असणारी वीज अनुदान सवलत मिळणेसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

मंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले,की राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून उद्योगवाढीसाठी वीजदर कमी करणे गरजेचे असून, त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. जे उद्योजक राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. अशा उद्योजकांना महाऊर्जा विभागाने पुढाकार घेऊन परवानगी द्यावी. तसेच, सुतगिरण्यांनी वस्त्रोद्योग विभागाकडून वीजदरात सवलत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. सौरऊर्जेला महत्व देण्यात यावे. सौरऊर्जेचा वापर मोठया प्रमाणात व्हावा यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, जे कारखाने वीजनिर्मिती करतात त्यांना वीजदरात सवलत देण्याबरोबरच खरेदी दर माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. ऊर्जा विभागाचे धोरण उद्योगांना पूरक असे राहिल तसेच सौरऊर्जेसंदर्भात लवकरच नवे धोरण आणण्यात येईल, असेही डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

बैठकीस राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर यांच्यासमवेत वस्त्रोद्योग व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.