Published On : Mon, Jun 7th, 2021

दुर्बल घटकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा

सभापती कांता रारोकर यांचे निर्देश : विविध योजनांचा घेतला आढावा

नागपूर : नागरी भागातील दुर्बल घटकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळत असतो. नागपुरात सुमारे १३ योजनांचा दुर्बल घटकांना लाभ दिला जातो. मात्र, बहुतांश योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळत नाही. यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावे आणि शासनाकडून आलेल्या निधीचा योग्य विनियोग दुर्बल घटकासाठी करण्यात यावा. सर्व योजनांचा त्यांना लाभ मिळावा. त्या दृष्टीने यापुढे झोन स्तरावर शिबिर आयोजित करावे, असे निर्देश मनपाच्यादुर्बल घटक समितीच्या सभापती कांता रारोकर यांनी दिले.

मनपाच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ किती लोकांना मिळाला, कुठल्या योजनांची अंमलबजावणी होत आहे, याचा आढावा घेण्याकरिता सोमवारी (ता. ७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला समितीचे सदस्य विजय चुटेले, शकुंतला पारवे, उषा पॅलट, वैशाली नारनवरे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्यासह आभास पद्धतीने अन्य सदस्य व अधिकारी सहभागी झाले होते.

दुर्बल घटकासाठी नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध १३ शीर्षांतर्गत निधीची तरतूद आहे. मागासवर्गीय उमेदवारास मुलाखतीस बोलविण्याचा प्रवास़ खर्च, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप, उद्यान सुधारणा, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, माध्यमिक शाळा इमारत दुरुस्ती, वैद्यकीय केंद्र उभारणे व मशिनरी खरेदी करणे, सफाई कामगारांना मालकी तत्वावर घर बांधणीकरिता अनुदान, अध्ययन कक्ष निर्माण, दुर्बल घटक बहुल वस्तीची सुधारणा, रस्त्याचे निर्माण, भूमिगत नाली बांधणे, स्वस्त प्रकारचे संडास निर्मिती, बीएसयूपी घरकुल योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल एस.सी./एस.टी. व नवबौद्धांकरिता घरकुल योजना अशा विविध शीर्षांतर्गत निधी उपलब्ध आहे. त्याचा विनियोग करण्याकरिता समितीतील सदस्यांशी चर्चा करून संबंधित शीर्षांतर्गत असलेल्या कामाचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. घरकुल योजनेची बहुतेकांना माहिती नाही. यासाठी झोनस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश सभापती कांता रारोकर यांनी दिले. घरकुल योजनेसोबतच स्वस्त दरात संडास योजनेची माहितीही शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. सदस्य विजय चुटेले यांनी जाटतिरोडीच्या शाळेत कोरोना चाचणी करण्याची सूचना केली.