Published On : Tue, Mar 31st, 2020

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट…

Advertisement

अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा बनावट फॉर्म वर संधीसाधू नगरसेवक करताहेत गरीबांची दिशाभूल

कामठी :- संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस चे तीव्र पडसाद भारतासह महाराष्ट्रात सुदधा पोहोचले आहे परिणामी संपूर्ण महाराष्ट्रासह कामठी तालुक्यात संचारबंदी, जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आल्याने सुरू असलेल्या या लॉकडाऊन मध्ये सर्व कामे ठप्प पडले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने गरिबांची थट्टा होऊ नये त्यांच्यावर उपासमारीची वेक येऊ नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ अशा पाच रुपये किलो भावाने एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्यात येण्याचे आदेश केले आहे तसेच शिधापत्रिका धारक नसलेल्या नागरिकांची सुदधा प्रशासनाकडून अन्न धान्याची सोय करण्याचे विचाराधीन आहे पण अधिकृत असे कुठलेही शासन आदेशित केले नाही तसेच अशा स्थितीत रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही.

सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. तर काही नगरसेवकाकडून हा फॉर्म सुद्धा भरवून घेतला जात आहे , त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने कामठी तालुका पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांनी केला आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत.

मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होत असून . नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन तालुका पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

संदीप कांबळे कामठी