Published On : Mon, May 3rd, 2021

कोरोना रूग्णाच्या उपचारामध्ये पोर्टेबल व्हेटींलेटरची उपयुक्तता तपासावी – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Advertisement

नागपूर: कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांचा जीव वाचला पाहीजे या उद्देशाने व्हेटींलेटर,ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन या वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची गरज आहे. त्यादृष्ट्रीनेच विदर्भातील तरुण अभियंत्यांनी तयार केलेल्या पोर्टेबल व्हेंटीलेटरच्या उपयुक्ततेची तपासणी करावी,असे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.

दुस-या लाटेतील कोरोना स्ट्रेनचा संसर्गाचे प्रमाण नागपुरात जास्त आहे. यामुळे रूग्णांची प्रकृती खालावून तो दोन -तीन दिवसात गंभीर होतो .ग्रामीण भागातून गंभीर वा अतिगंभीर रूग्णाला शहराकडे आणतांना त्याला पोर्टेबल व्हेंटीलेटर मदतीचा ठरेल. याच पोर्टेबल व्हेंटीलेटरचे सादरीकरण पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या समोर आज करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यावेळी उपस्थित होते.

शासकीय वैदयकीय महाविदयालयातील डॉ.वैशाली शेलगांवकरांनी या मशीनची तांत्रिक माहिती जाणून घेतली. कंपनीचे एम.डी. आकाश गडडमवार यांनी कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या अन्य संयंत्राची देखील सादरीकरण व माहिती पालकमंत्र्यांना दिली.