Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Mar 7th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे लाभ सर्व सफाई कामगारांना द्यावे – देवेंद्र फडणवीस

  सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन
  सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले देण्यात यावीत
  सफाई कामगारांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांसाठी ‘बार्टी’ने प्रशिक्षण द्यावे

  नागपूर: सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

  सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड,राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, नंदकिशोर महतो, रामसिंग कछवाह, लिला हाथीबेड, विजय चुटेले, सतीश सिरसवान, सुदाम महाजन, राजेश हाथीबेड,अजय हाथीबेड, सतीश डागोर, बाबुराव वामन, राजीव जाधव, मुकेश बारमासे सामाजिक न्यायविभागाचे सचिव दिनेश वाघमारे, कामगार आयुक्त आर.आर. जाधव, नगरविकास विभागाचे उपसचिव सतिष मोघे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सफाई कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्याच्याअनुषंगाने विविध निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाड समितीने सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण काम केले आहे. ठेकेदारी व कंत्राटी पद्धतीतील सफाई कामगारांनाही लाड समितीचे निर्णय लागू करण्यात यावेत. सफाई कामगारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे विचाराधीन असून सफाई कामगारांची सर्व पदे आकृतीबंधानुसार भरण्यात यावीत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदे तयार करावित. यासंदर्भातील निकष तपासण्यासाठी चार सदस्यांची समिती तयार करुन समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा. असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

  नुकतीच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू करण्यात आलेली पेन्शन योजनाही सफाई कामगारांना लागू होवू शकेल. सफाई कामगारांपर्यंत हे लाभ पोहचविण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असेल. सफाई कामगारांच्या पाल्यांना विविध शिक्षणसुविधा देणे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. ‘बार्टी’ने यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेवून या कामगारांच्या मुलांना संबंधित प्रशिक्षण द्यावे. सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले देण्यात यावीत. तसेच काम करीत असताना सफाई कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर निर्देशानुसार मिळणारी मदत संबंधितांना देण्यात यावी. असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

  यावेळी सर्व लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय व राज्य सफाई कामगार आयोगाचे पदाधिकारी व सफाई कामगारांच्या संदर्भात कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी यांनी विविध सूचना मांडल्या.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145