Published On : Wed, Mar 27th, 2024

सावरकरांवरील चित्रपट राष्ट्र निर्माणाची प्रेरणा देणारा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

अभिनेते रणदीप हुडा यांच्या उपस्थितीत प्रिमीयर
Advertisement

नागपूर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनेते रणदीप हुडा यांनी खूप कष्ट घेतले आहेत. अतिशय समर्पणातून साकारलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा नक्कीच राष्ट्र निर्माणाची प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) केले.

सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक व अभिनेते रणदीप हुडा यांच्या उपस्थितीत व्हीआर मॉलमधील सिनेपोलीस येथे प्रिमीयरचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेते श्री. संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘रणदीप हुडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला.
त्यांच्या व्यक्तित्वातील प्रत्येक पैलू जाणून घेतला आणि त्यानंतर चित्रपटाची निर्मिती सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीयवाद, अस्पृष्यता नष्ट व्हावी म्हणून संघर्ष केला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबानेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले.

त्यांचा विचार पोहोचविण्याचा हुडा यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून नव्या पिढीला राष्ट्र निर्माणाची प्रेरणा देणारा आहे.’ रणदीप हुडा यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.