
नागपूर : शहरातील सेमिनरी हिल्स परिसरातील संत कृपा कॉलनी येथे दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गणवीर कुटुंबाच्या घराच्या किचनमधून सुमारे सात फूट लांबीचा साप बाहेर येताना दिसल्याने एकच खळबळ उडाली.
दुपारी अंदाजे ३ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी किचनमधून साप कंपाउंडकडे सरकत विहिरीच्या दिशेने जात असल्याचे पाहिले. एवढा मोठा साप पाहून घरातील सदस्य घाबरले. काही वेळातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच नागपूरमधील प्रसिद्ध वन्यजीव बचाव संस्था Wild Animals and Nature Helping Society चे अध्यक्ष शुभम जी.आर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी अत्यंत कौशल्याने सापाला पकडले.
हा साप इंग्रजीत रॅट तर हिंदीत ‘धामण’ म्हणून ओळखला जातो. हा साप विषारी नसला तरी त्याची लांबी मोठी असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती.
शुभम जी.आर यांनी सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वन्यजीव तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रसंगी घाबरून न जाता तज्ञांशी संपर्क साधावा आणि सापांना मारण्याचा प्रयत्न करू नये.








