Published On : Fri, Oct 22nd, 2021
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

फेसबुक, इन्स्टावर ‘ब्लू टिक’च्या नादात होईल घात : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

जाळे टाकण्यासाठी दलाल सक्रीय खाते कायमस्वरुपी ब्लॉक होण्याची शक्यता.

नागपूर: सोशल मिडियावरील फेसबूक, इन्स्टा, ट्विटर अकाऊंटला ब्लू टिक मिळणे संबंधितांचासाठी मानाचे समजले जात आहे. फेसबुक किंवा इन्स्टावरील फालोअर्ससह सातत्याने समाजहिताच्या पोस्ट, लेखन आदी करणारे यूजर्स पात्र ठरतात. परंतु हे ब्लू टिक मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावर दलालही सक्रीय झाले आहेत. त्यांच्या मदतीने ब्लू टिक मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही बाब फेसबूक, इन्स्टाच्या तंत्रज्ञ टिमला कळल्यास कायमस्वरुपी ब्लॉक होण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक वयोगटातील व्यक्ती कुठल्याही माहितीसाठी, मनोरंजनासाठी फेसबुक, इन्स्टावर निर्भर झाल्याचे चित्र आहे. यात व्यावसायिक, राजकीय नेते व प्रोफेशनल युजरचाही समावेश आहे. आता फेसबूकतर्फे दिल्या ‘ब्लू टिक’ची भर पडली आहे. ही ब्लू टिक मिळविणे सोशल मिडिया यूजरसाठी हे मानाचे समजले जात असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. ब्लू टिक मिळविण्यासाठी फेसबुकच्या नियमानुसार नियमित चांगल्या, समाजहिताच्या पोस्ट, लेखनात सातत्य, मोठ्या प्रमाणात असलेले फालोअर्स, त्यांच्याकडून मिळणारी दाद, हेच यूजर ब्लू टिक मिळवण्यासाठी पात्र ठरतात. परंतु अलिकडे ब्लू टिक मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावरील दलाल सक्रीय झाले आहेत.

हे दलाल कमी वेळात ब्लू टिक मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्य यूजर्स ३० हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम घेत असल्याचे समजते. देशभरातील ऑनलाईन इंग्लिश पोर्टल्सवर लिखाण प्रकाशित करू असे सांगून दलाल यूजर्सचे लॉगिन, पासवर्डही मागतात. विकिपीडियाची माहिती, इमेल मागितल्यानंतर ते कामाची रक्कम ॲडव्हांसमध्ये मागतात. पात्र नसतानाही ‘ब्लू टिक’ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यात मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोशल मिडियावरील व्यक्ती राजकीय किंवा मोठा व्यावसायिक असल्यास त्याच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो. शिवाय आर्थिक लूटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्पुरते ऑनलाईन लेख, वृत्त अथवा पेड पब्लिसिटी ब्लू टिक मिळवून देण्यात कामी येत नाही, उलट यूजर्सचे सोशल मीडियावरील अस्तित्व संपुष्टात येईल, असे पारसे म्हणाले. तात्पुरत्या स्वरूपात यूजर्सने ब्लू टिक मिळवली अन् सोशल मिडिया कंपनीच्या तांत्रिक टीमला कळले तर कुठलीही माहिती न देता अकॉउंट कायस्वरूपी डिलीट केले जात असल्याने मोठा फटका यूजर्सला बसण्याची शक्यता आहे.

दलालांकडून केलेला प्रयत्न बूमरॅंग
पात्र नसताना ब्लू टिक मिळवून दिल्याचे दलालाला माहिती असते. हेच दलाल यूजर्सला ब्लॅक मेल करून पुन्हा त्याच्याकडून पैसे उकळू शकतात. एखादवेळी यूजर्सने पैसे न दिल्यास हे दलाल फेसबूकला यूजर्सबाबत माहिती देऊ शकतात. त्यामुळे यूजर्स फेसबुकवरून कायमचा ब्लॉक होऊ शकतो.

‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी यूजर्सने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविणे, ऑनलाईन जनसंपर्क वाढविणे ही सोपी पद्धत आहे. फेसबुकचा फॉर्म ऑनलाईन भरून द्यावा लागतो. धार्मिक, अतिरेकी विषयांची पोस्ट प्रोफाइलमध्ये असल्यास ‘ब्लू टिक’ मिळत नाही. ते मिळवण्यासाठी कोणतीही सोशल मीडिया कंपनी ऑफर देत नाही, इमेल, मेसेज करीत नाही. त्यामुळे यूजर्सने दलालांच्या नादी लागून प्रतिष्ठा गमावू नये.

– अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com