नागपूर : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती महल भागात धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. गांधी गेटजवळील एका इलेक्ट्रिक दुकानात अज्ञात चोरांनी छत फोडून आत प्रवेश करत तब्बल ११ लाख रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही प्रणालीचा डीव्हीआर चोरून नेला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव इलेक्ट्रिक या दुकानाचे मालक मनोज कुमार बिसेनदास खत्री यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. मात्र, बुधवारी सकाळी दुकान उघडताना त्यांनी पाहिलं की तिजोरीतील रोकड ठेवलेली बॅग गायब होती. तात्काळ त्यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात समोर आलं की चोरांनी छतावाटे आत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, त्यांनी दुकानातील इतर कोणत्याही वस्तूंना हात लावला नाही, फक्त रोख रक्कम आणि डीव्हीआर उचलून नेला. यावरून हे स्पष्ट होतं की चोरीचं नियोजन पूर्वनियोजित होतं आणि आरोपींना दुकानातील रोकड ठिकाणाची अचूक माहिती होती.
गर्दीच्या भागात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा भागात पोलिस गस्त असूनही एवढी मोठी चोरी होणं म्हणजे सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
दरम्यान, कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.