नागपूर : जरीपटका येथील हुडको कॉलनी परिसरात तलवारी, चाकू, काठ्या घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांच्या टोळीने रविवारी रात्री मोठी दहशत निर्माण केली. या टोळीने सुमारे दोन डझन वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुख्यात गुंड आयुष मेश्राम उर्फ मल्ल्या, याच्या टोळीतील सदस्याच्या त्याच टोळीतील पवन नावाच्या युवकाशी वाद झाला. त्याचा बदल घेण्यासाठी हुडको कॉलनी परिसरात राडा घालण्यास सुरुवात केली. टोळक्याने आरडाओरडा व शिवीगाळ करत पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, ते काय घडत आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्याने जरीपटका पोलीस निरीक्षक संतोष बकाल आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. डीसीपी झोन व्ही अनुराग जैन यांनीही घटनास्थळी पोहोचून लोकांकडून माहिती घेतली. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. इंदोरा भागातील तरुणांच्या टोळीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह 6-7 जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता हे सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे समोर आले.
याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही अल्पवयीन मुलांसह सुमारे 10 जणांना जरीपटका पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर सीपी अमितेश कुमार यांनी पोलिसांना टोळीविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.