Published On : Wed, Dec 19th, 2018

शिक्षण सप्ताह विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारा – महापौर नंदा जिचकार

Advertisement

केंद्रीय स्पर्धांचे थाटात उद्‌घाटन : २२ डिसेंबरला समारोप

नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आयोजित शिक्षण सप्ताह विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक व्यायाम आणि सांस्कृतिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण सप्ताह पोषक ठरत असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या शिक्षण विभागातर्फे १४ ते २२ डिसेंबरदरम्यान आयोजित शिक्षण सप्ताहाअंतर्गत केंद्रीय स्पर्धांचे उद्‌घाटन बुधवारी (ता. १९) यशवंत स्टेडियम येथे सकाळी पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, कुसूम चापलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीटा निरीक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे बोलताना म्हणाल्या, मनपा शाळांचा शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण सप्ताह हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. यंदाचे आयोजन हे आगळेवेगळे असून संपूर्ण शिक्षण विभाग अभिनंदनास पात्र असल्याचे सांगत सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण सप्ताहाच्या सुंदर आयोजनाबाबत शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मनपाच्या शाळांची प्रगती होत असून मागील वर्षांपासून पटसंख्या वाढत आहे. बदलत्या काळानुसार मनपाच्या शाळाही बदलत असल्याचा उल्लेख करीत मनपाच्या शाळांतून शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे यांनीही सर्व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. झोनस्तरावरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन बघता मनपा शाळा आयोजनात कुठेही कमी पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात आपल्या यशाची पताका रोवणाऱ्या मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा त्यांनी यावेळी शाब्दिक गौरव केला आणि केंद्रीय स्पर्धेत पोहचलेल्या संघांना आणि खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मैदानांचे पूजन करुन स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. केंद्रीय स्पर्धा १९ ते २१ डिसेंबर दरम्यान चालणार असून समारोप २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल यांनी यावेळी दिली. बुधवारी सांघिक खेळांतर्गत फुटबॉल, लंगडी, रस्साखेच, कबड्डी या स्पर्धा झाल्या. गुरुवार २० डिसेंबर रोजी धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, तिहेरी उडी या मैदानी स्पर्धा होतील तर शुक्रवार २१ डिसेंबर रोजी नाटक, नृत्य या सांस्कृतिक स्पर्धांसोबतच वक्तृत्व स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा होतील.

Advertisement
Advertisement