Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 7th, 2020

  मनपाच्या चमू अविरत करीत आहे गरजूंना अन्नदानाचे कार्य

  दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा : सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

  नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरजू व्यक्तींना दोनवेळच्या भोजनाचा पुरवठा तसेच दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा व निराधार ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका सेवाभावी संस्था आणि सामाजिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरत करीत आहेत.

  नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत ही सेवा पोहचत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने नागपूर शहरात असे १७२ निवारागृह उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६८०६ इतकी आहे. आजघडीला या निवारागृहात ५५९५ नागरिक वास्तव्यास असून दररोज ही संख्या वाढत आहे. ह्या संपूर्ण नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी मनपाने २६केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था केली आहे. निवारागृहात असलेल्या आणि झोपडपट्यामधील गरजू व्यक्तींनाही या स्वयंपाकघराच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे कार्य मनपाच्या चमू दिवसरात्र करीत आहे.

  ४ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५५६, झोपडपट्ट्यातील ९९०५ असे एकूण १५४६१ नागरिकांना अन्न पुरवठा करण्यात आला. ५ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५७८ आणि झोपडपट्टीतील ११४३६ अशा एकूण १७०१४ नागरिकांना आणि ६ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५९५ आणि झोपडपट्टीतील १५९४७ अशा एकूण २१५४२ नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले.

  दिव्यांगांना रेशन तर निराधार ज्येष्ठांना भोजन व्यवस्था
  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून चार दिवसांपूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यामाध्यमातून आतापर्यंत ४० दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी मदत मागितली असून मनपाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांपर्यंत रेशन कीट पोहचविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य २२०० कुटुंबांनाही रेशन किट पुरविण्यात आली आहे. रेशन किट मध्ये गव्हाचे पीठ (५ कि.ग्रॅ.), तांदूळ (२.५ कि.ग्रॅ.), डाळ (१.२५ कि.ग्रॅ.), मिरची पावडर (२५० ग्रॅम), हळद पावडर (१२५ ग्रॅम), मसाला (२५० ग्रॅम), मीठ (२५० ग्रॅम), खाद्य तेल (१ कि.ग्रॅ.), कांदे (२ कि.ग्रॅ.), आलू (२ कि.ग्रॅ.) या वस्तूंचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला सात दिवस पुरेल इतकी ही व्यवस्था आहे. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे स्वादिष्ट भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

  सामाजिक संस्थांनी दिले दान
  लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दान दिले आहे. आतापर्यंत रोटरी क्लब, पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशन, मे. एस. एस. कुळकर्णी ॲण्ड असोशिएटस्‌, मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, लॉयन्स क्लब यांच्या माध्यमातून ११४०० कि.ग्रॅ. गव्हाचे पीठ, ११२०० कि.ग्रॅ. तांदूळ, ५६०० कि.ग्रॅ. डाळ, ३३३० कि.ग्रॅ. तेल, ५५२० कि.ग्रॅ. मीठ, ९००० नग साबण, १०८.३ कि.ग्रॅ. हळद, ११८.३ कि.ग्रॅ. मिरची पावडर, २० कि.ग्रॅ. मसाला, १११०० कि.ग्रॅ. कांदे आणि १११०० कि.ग्रॅ. आलू नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. मॉईलने १० लाख रुपये दिले असून १५०० अन्न पॅकेट दररोज वितरीत करीत आहेत. विजय ढवंगळे आणि अजय ढवंगळे यांनी १० लाख रुपये आणि श्री रमण यांनी १२५०० रुपये दान दिले आहेत. मे. इस्कॉन, अन्न अमृत फाऊंडेशन, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, संस्कार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, शगून महात्मा औद्योगिक सहकारी संस्था, नागपूर महिला सहकारी सनसञथा, मैत्री परिवार आदींच्या माध्यमातून अन्न तयार केले जात आहे.

  मुलाच्या मदतीसाठी परदेशातील महिलेचा ई-मेल
  लॉकडाऊनमध्ये नागपुरात अडकलेल्या एका परदेशातील विद्यार्थ्याच्या आईचा ई-मेल नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये मोबाईल क्र. किंवा सविस्तर पत्ता नव्हता. केवळ संबंधित विद्यार्थी हजारी पहाड परिसरात राहतो, असा उल्लेख होता. केवळ या माहितीच्या आधारे मनपाच्या चमूने ग्रो व्हिल फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला आवश्यक ते सामान पोहचविले. असेच एक उदाहरण वृद्ध महिला व तिच्या नातवांचे आहे. नातवांसोबत राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या नातवांनीही मदतीसाठी आर्जव केली. त्यांनाही दिवसरात्र भोजन पुरविण्याचे कार्य मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून मनपा करीत आहे.

  गुगल शीटच्या माध्यमातून संनियंत्रण
  नागपूर शहरातील एक नागरिक शोबीत चांडक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या सेवाभावी कार्यात स्वत:चेही योगदान दिले आहे. मनपाची मदत योग्य ठिकाणी पोहचते की नाही याचे मॉनिटरींग करण्यासाठी त्यांनी एक गुगल शीट मनपा अधिकाऱ्यांना तयार करून दिली. कलर कोडच्या माध्यमातून झोननिहाय त्यात माहिती अपडेट केली जाते. दररोज येणारी मागणी आणि होणारा पुरवठा याबाबत यात अपडेट होत असून जर गरजूला मदत मिळाली नाही तर लगेच ते नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना माहिती होते. मग तातडीने संपर्क करुन त्यांना मदत पोहचविली जाते.

  दान आणि मदतीसाठी करावा संपर्क
  नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे सेवाकार्य समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना या सेवाकार्यात दान द्यायचे आहे अथवा ज्या गरजूंना मदत हवी आहे त्यांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145