Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 10th, 2020

  राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान तसेच युवा कार्यकर्ते व नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद -अजित पवार

  ‘राष्ट्रवादी’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

  ‘राष्ट्रवादी’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

  मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा, तरुणांना नेतृत्वाची संधी देणारा पक्ष आहे. पक्षाने गेल्या २१ वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत दिलेले योगदान, राज्यात उभी केलेली युवा कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद आहे. हीच ताकद भविष्यातही महाराष्ट्राला प्रगतीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उज्वल यशाकडे घेऊन जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

  दरम्यान राज्यातील जनतेला तसेच पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्ताने अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  आदरणीय शरद पवार साहेबांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून एखाद दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील जनतेने सातत्याने पक्षावर विश्वास दाखवला आहे. ही जनतेच्या विश्वासाची सर्वात मोठी पावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील जनतेचा विश्वास वेळोवेळी सार्थ ठरवत महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातत्याने योगदान दिले. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या प्रत्येक संकटात आदरणीय पवार साहेबांसह पक्षाचा कार्यकर्ता मदतीसाठी धावून गेला आहे. पक्षाची आजवरची यशस्वी वाटचाल ही आदरणीय साहेबांचे समर्थ नेतृत्व आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे.

  कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे यश…
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुन्हा एकदा, राज्यात सत्तेवर आहे. ही संधी सहजपणे मिळाली नसून गेली पाच वर्षे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षातून मिळाली आहे. गेली पाच वर्षे तत्कालिन सरकारच्या शेतकरीविरोधी, लोकविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा, हल्लाबोल यात्रा, परिवर्तन यात्रा काढली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर ‘जेलभरो’सारखी आंदोलने केली. विधीमंडळात, विधीमंडळाबाहेर रस्त्यावर उतरुन जनतेसाठी संघर्ष केला. स्वत: आदरणीय साहेबांनी अनेक ठिकाणी संघर्षाचे नेतृत्व केले. त्यातून पक्षाला ही संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेच्या इच्छा, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

  सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन..
  महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करीत असल्याने पक्षाचा वर्धापनदिन उद्या अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. कुठेही जाहीर कार्यक्रम घ्यायचे नाहीत. गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून उद्या, पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त, पक्षाच्यावतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेने रक्तदान करावे, सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

  कोरोना रुग्णांना रक्ताची गरज नसली तरी राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नागरिक सामाजिक जाणीवेतून उद्या मोठ्या संख्येने रक्तदान करतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

  राज्यातील युवक, युवतींनी ‘राष्ट्रवादी’त यावं…
  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली २१ वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे. मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त बांधव, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष काम करत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे. अधिकाधिक समाजघटकांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145