‘निसर्ग’ चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात भातशेती आणि फळबागा व मासेमारी व्यवसायाचे मोठे नुकसान…
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आजुबाजुच्या जिल्हयातील मनुष्यबळ वळवायला हवे…
सरकारने दिलेले धान्य भिजून गेले… पुन्हा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रयत्न करतायत…
रायगड : – रायगड जिल्हावर कोरोनाचे संकट असताना चक्रीवादळाचेही संकट आलेय. त्यामुळे दोन्ही संकटाशी झुंजणाऱ्या रायगडला केंद्र व राज्यसरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शिवाय शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘निसर्ग’ चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात भातशेती आणि फळबागा व मासेमारी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. नारळ आणि सुपारीची पिकंही उद्ध्वस्त झाली आहेत. नारळ, काजू, सुपारीच्या बागा उध्वस्त होणं म्हणजे पुढील १० वर्षाचे नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानकारक परिस्थिती पाहता केंद्राच्या मदतीशिवाय चांगले पॅकेज देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्रसरकारचे पथक येवून गेल्यानंतर येथील पंचनाम्याची माहिती घेवून यासंदर्भात केंद्र सरकारशी बोलणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेचे मोठे हाल झाले आहेत त्यामुळे अशा संकटात
मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मदत घेता येईल का तेही पाहायला हवे असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. वीज पुरवठा लवकर सुरळीत केला पाहिजे असे सांगतानाच वीज खात्याचे सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे. यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ इकडे वळवून ४ ते ५ दिवसात वीज पुरवठा सुरू करायला हवा असेही शरद पवार यांनी सांगितले.
कोरोना काळात लोकांना सरकारने यापूर्वी दिलेले धान्य पावसात भिजले आहे. त्यांना परत धान्य दिले पाहिजे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क केलाय, अन्नधान्य पुन्हा देण्याचा निर्णय ते घेतायत असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
घरांचे नुकसान झालेय शिवाय अन्नधान्याचेही नुकसान झाले आहे. कच्ची घरे कालांतराने कोसळतात त्याची काळजी पंचनाम्यात घ्यायला हवी हेही शरद पवार यांनी सांगितले.
इथले लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करतेय याचे कौतुकही शरद पवार यांनी केले.
यापूर्वी अनेक संकटं बघितली असल्याचे सांगताना शरद पवार यांनी जालना, औरंगाबाद परिसरात मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या याची माहिती दिली. त्याठिकाणी भेट दिली होती. या बागायतींना आम्ही ४ ते ५ दिवसात केंद्र सरकारकडून ३५ हजार रुपये हेक्टरी मदत केली होती असे सांगितले.
जे नुकसान झालंय त्याचे प्रमाण मोठे आहे. राज्यात यापूर्वी अशी संकट आली आहेत. कोकणातही आली होती. जांभूळपाडा इथली आपत्ती मला आठवते तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने तिथली गावं उभी केली होती. पंतप्रधान राजीव गांधी तिथे आले होते. त्यानंतर नागोठणे येथील घटना, त्यानंतरचा २००५ ची अतिवृष्टी यावेळी कोकणाला भेट दिल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगितली.
याअगोदर केंद्र व राज्य सरकारने मदत केली आहे. त्यामुळे राज्याने आणि केंद्राने मदत केली पाहिजे.
त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारकडे पाठपुरावा करायला हवा असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.