Nagpur: अत्याधुनिक साधने व तंत्रज्ञानाचा वापर करुन जगातील सर्वोत्कृष्ट वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष मुंबई येथे कार्यान्वित झाले असून, त्याच धर्तीवर नागपूर व पुणे येथील वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष्ा निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर पोलिसाच्या उत्कृष्ट पोलिस सेवा अध्ययन केंद्र अर्थात एन कॉप्स एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
छावनी परिसरातील पटेल बंगला येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, पोलिस महासंचालक सतिश माथूर, पोलिस आयुक्त डॉ. के वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित होते.
एन कॉप्स या पोलिस विभागातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पोलिस विभागाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्याला मदत होईल. पोलिस विभागामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागात व्यावसायिकता आणण्यासोबतच गुणवत्ता व विश्वासार्हता वाढल्यामुळे जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करु शकतो.
पोलिस दलातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच जनतेमध्ये विश्वासार्हता वाढावी, यासाठी सीसीटीएनएसच्या माध्यमातून शंभर टक्के पोलिस स्टेशन जोडण्यात आले आहे. त्यासोबतच संपूर्ण रेकॉर्ड डीजीटलायझेशन करण्यात येत आहेत. पेालिस अधिकारी व कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्याची गरज या केंद्रातून पूर्ण होणार आहे.
गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण वाढविण्यासाठी केवळ चांगले वकील लावून केस जिंकता येत नाही. त्यापेक्षा मूलभूत पुरावे कसे गोळा केले जातात, हे महत्त्वाचे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, यासाठी मूलभूत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात चोवीस फॉरेन्सिक प्रयोगशाळा असून, या प्रयोगशाळांच्या माध्यमातून गुन्हे तपासाचे प्रमाण वाढविले जाऊ शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सायबर गुन्ह्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा गुन्ह्यांवर नियंत्रण करणारी गुणवतापूर्ण यंत्रणा उभी करताना राज्यात 42 सायबर लॅब तयार केल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करताना शिस्तप्रिय दलासोबतच त्यांच्यामधील भावनासुध्दा जीवंत असणे आवश्यक आहे. जनतेला आधार देण्याच्या कामामुळेच लोकांचे मतपरिवर्तन होऊ शकते, यासाठी पोलिस दलाची सक्षमता तयार करण्यासोबतच चांगल्या सुविधाही उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसंदर्भात नागपूर पोलिसांनी भरोसा सेल तयार केले असून, या सेलमार्फत सुरु असलेल्या सकारात्मक प्रभावी व परिणामकारक उपक्रमामुळे अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये भरोसा सेल ही महत्त्वाची संस्था निर्माण करण्यासाठी नागपूर पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुक करताना राज्याला दिलेली महत्त्वाची भेट ठरली आहे, असे ते म्हणाले.
नागपूरच्या गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, होळीसारख्या महत्त्वाच्या सणांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये चांगली सुधारणा करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी चांगले वातावरण शहरात निर्माण केले असून, गुन्हेगारी हाताळण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व गंभीर गुन्ह्यामध्ये राज्याचा देशात बराच खालचा क्रमांक असला तरी हा क्रमांक अधिक खाली जावा, यासाठी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणसोबतच प्रशिक्षणाला प्राधान्य देवून दर्जा व गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
सर्वांना अत्यंत प्रभावी व उच्च दर्जाची सेवा देतानाच पोलिस दलामध्ये संवेदनशीलता वाढविण्यावर आमचा भर असल्याचे पोलिस महासंचालक सतिश माथूर यांनी यावेळी सांगितले.
पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलिस दलात काम करताना नागपूरच्या भरोसा सेलची गुणवत्ता आणि संख्यात्मकरीत्या वाढवण्यावरही भर देण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. उत्कृष्ट पोलिस सेवा अध्ययन केंद्राच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.