Panvel: संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता ही तर शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाची सुरुवात असून राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरुच राहील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सर्व विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पनवेल येथे विराट जाहीर सभेने झाला. या सभेला संबोधीत करताना ते बोलत होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील. शोतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबु आझमी, पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात प्रगतीत देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. या सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. या सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. रोज शेतकरी मरत आहेत पण सरकारकडे संवेदनाच शिल्लक नाहीत. या सरकारला जागे करण्यासाठी शेतक-यांना न्याय देण्यासाठी ही संघर्षयात्रा काढली आहे. मुख्यमंत्री राज्यातील शेतक-यांची टिंगल करत आहेत. शेतक-यांची टिंगल करू नका ते पेटून उठले तर तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत असे खा. चव्हाण म्हणाले. संघर्ष यात्रेमुळे सरकार झुकले आणि पीकविम्याचे पैसे कर्जखात्यात जमा करण्याचा निर्णय मागे घेतला आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र करून या सरकारला कर्जमाफी द्यायला बाध्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार असे चव्हाण म्हणाले.
याच सभेला मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून मला १९८२ च्या शेतकरी दिंडीची प्रतिमा संघर्ष यात्रेत दिसली. भाजपने दिलेले शब्द पाळले असते तर कर्जमाफी मागितली नसती पण दिलेला शब्द पाळायचा नाही हे भाजपचे वैशिष्ट्य आहे असे पवार म्हणाले. मनमोहनसिंहांचे सरकार कर्जमाफी देऊ शकते मग नरेंद्र मोदींचे सरकार का देऊ शकत नाही ? असा सवाल त्यांनी सरकारला केला. राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ्या लोकांना दिलेली 2 लाख 80 हजार कोटींपेक्षा जास्तीची कर्ज वसूल होत नाहीत म्हणून केंद्र सरकारने त्यांना मदत केली. मोठ्या लोकांना जशी मदत करता तशी शेतक-यांनाही द्या अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले की, भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस म्हणायचे शेतकरी आत्महत्या ही सरकारी हत्या असून सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत आता फडणवीस स्वतःवर नऊ हजार गुन्हे कधी दाखल करून घेणार आहेत असा सवाल राणे यांनी केला. राज्य सरकारकडून शेतक-यांची चेष्ठा सुरु असून शेतकरी या सरकारची घमेंड उतरवतील असे राणे म्हणाले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही शेतकरी कर्जमाफीशिवाय ही चळवळ थांबणार नसून कर्जमाफी केली नाही तर सत्ता सोडावी लागेल असा इशारा सरकारला दिला.
दरम्यान याच सभेत बोलताना शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ, प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी शेतकरी कर्जमाफीहोईपर्यंत सर्व विरोधी पक्ष हा लढा थांबणार नाहीत अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
दरम्यान राज्यातील 16 जिल्हे आणि 2500 किमीपेक्षा जास्तीचा प्रवास करून संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा पनवेल येथे विराट जाहीर सभेने समारोप झाला.