मुंबई : पशुपक्ष्यांच्या विभिन्न प्रजातींचा निसर्गातील वातावरणावर तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) करत असलेले कार्य मोलाचे आहे. सोसायटीच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यास राज्य शासनास आनंद होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘बीएनएचएस’च्या हॉर्निमन सर्कल येथील इमारतीचा भाडेपट्टा करार लवकरात लवकर वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘बीएनएचएस’च्या हॉर्निमन सर्कल येथील कार्यालयास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘बीएनएचएस’चे अध्यक्ष होमी ख्रुसोखान, संचालक दीपक आपटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘एमएमआरडीए’चे सहआयुक्त संजय खंदारे, ‘बीएनएचएस’चे एन वासुदेवन, डेबी गोयंका आदी यावेळी उपस्थित होते.
पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या टॅक्सीडर्मीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. क्युरेटर राहुल खोत यांनी दुर्मिळ प्रजातींची माहिती दिली. यावेळी पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाची व स्थलांतराची माहिती इंडियन बर्ड मायग्रेशन ॲटलासचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तुहीन कट्टी व डॉ. भालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, निसर्गातील पशुपक्ष्यांच्या प्रजाती वाचविण्यासाठी ‘बीएनएचएस’चे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय मोलाचे आहे. अनेकदा कळत-नकळतपणे मानवाकडून पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाला धोका पोहोचत असतो. त्यामुळे होणाऱ्या निसर्गातील बदलाचे परिणाम मानवाच्या जीवनावर पडताना दिसते. निसर्गात आवश्यक असलेल्या पशुपक्ष्यांच्या वास्तव्याचे महत्त्व ‘बीएनएचएस’ सारख्या संस्थांमुळे कळत असते.
विकास करताना अनेकदा निसर्गाला धक्का पोहोचत असतो. निसर्गाने जे काही दिले आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे निसर्गाला, पशु-पक्ष्यांच्या उत्पत्ती व वास्तव्य स्थानांना धोका न पोहचू देता शाश्वत विकास कामे करण्यासाठी ‘बीएनएचएस’ने वेळोवेळी राज्य शासनास मार्गदर्शन मदत करत आहे. पशुपक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी करत असलेले ‘बीएनएचएस’चे काम हे सेवाभावी आहे. त्यामुळे राज्य शासन तसेच शासनाच्या एमएमआरडीए, सिडको यासारख्या संस्था बीएनएचएसच्या कार्याला सर्वतोपरी मदत करतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
श्री. आपटे यांनी संस्थेची माहिती व संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. श्री. ख्रुसोखान यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे स्वागत केले.
