Published On : Sun, Sep 18th, 2022

गोरगरीब, गरजूंच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य समाधान देणारे

Advertisement

ना. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे वितरीत

नागपूर : परिस्थितीमुळे आणि आलेल्या वेळेमुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्वपूर्ण घटक आहेत. म्हातारपणामध्ये येणा-या अडचणींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग बांधवांना सहाय्यक साधनांच्या अभावी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे कार्य केले जात आहे. याअंतर्गत नागपूर शहरातील लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देता येत असल्याचा आनंद आहे. समाजातील गरीब, गरजू आणि परिस्थितीमुळे अडचणींचा सामना करत असलेल्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकारातून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलते आहे, हे हास्य आपल्या कार्याप्रति समाधान देणारे असल्याची भावना केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा सेवाभावी शिबिराचे आयोजन ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम भेट असल्याचे नमूद करीत त्यांनी मा.प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने मध्य नागपुरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने शनिवारी १७ ऑगस्ट २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते साहित्य वितरणाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

मंचावर आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी श्री. विपीन इटणकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, शिबिराचे संयोजक माजी नगरसेवक श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) चे श्री. सेनगुप्ता, उपायुक्त श्री. विजय हुमने, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर,

माजी नगरसेवक सर्वश्री ॲड. संजय बालपांडे, राजेश घोडपागे, दीपराज पार्डीकर, संजय महाजन, माजी नगरसेविका वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, विद्या कन्हेरे, सरला नायक आदी उपस्थित होते.

यावेळी ना. नितीन गडकरी म्हणाले, संपूर्ण देशात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) हा त्याचाच एक भाग असून यामार्फत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे जीवन समृद्ध आणि सुसह्य करण्याचा मानस आहे. परमेश्वर मानून रंजल्या गांजल्यांची सेवा केल्यास त्यातून मिळणारे समाधान हे आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारे असल्याचेही ते म्हणाले. देशातील पहिले दिव्यांग पार्क पूर्व नागपुरात साकारले जात असून या महिन्यामध्येच त्याच्या कार्याचे भूमिपूजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांना नागपूराजवळील धार्मिक स्थळांचे दर्शन करता यावे यासाठी नि:शुल्क ई-बस सुरू करण्यात आली. या बसद्वारे आतापर्यंत २३ हजाराच्या वर नागरिकांनी प्रवास केला. यात पुन्हा एका ई-बसची भर पडणार असून त्याद्वारे सुमारे १ लाख ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचे दर्शन करता येणार असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे हीच या शिबिरामागील भावना आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मनपा आयुक्त आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना यांच्या नेतृत्वात मनपाद्वारे करण्यात आलेल्या कार्याचे आज फलीत झाल्याचे सांगत त्यांनी मनपाचे अभिनंदन केले.

मध्य नागपूरचे आमदार श्री. विकास कुंभारे यांनी नागपूर शहराच्या इतिहासातील ऐतिहासिक कार्यक्रम असल्याचे सांगत शिबिराचे कौतुक केले. नागपूर शहराचा आणि येथील प्रत्येक घटकाचा, नागरिकाचा सर्वांगिण विकास करण्याच्या भावनेतून केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे कार्य सुरू असल्याचेही ते म्हणाले. नागपूर शहराच्या इतिहासात जे मागील ५० वर्षात झालेले नाही ते आज ना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मागील ७ वर्षात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित शिबिर हे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळवून देणारा उपक्रम असल्याचे सांगत ना. श्री. नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव केला. श्री. तिवारी यांनी मनपातर्फे दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. मनपाच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दिव्यांगांना ५० हजार रुपये अनुदान देणारी नागपूर महानगरपालिका देशातील पहिली मनपा ठरली आहे. याशिवाय २०० दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ‘नॉन रिफंडेबल’ निधी देणारी सुद्धा नागपूर मनपा देशातील पहिली मनपा असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांनीही आपले मत व्यक्त करून ना.श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या कार्याप्रति त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी प्रास्ताविकात शिबिराची भूमिका विषद केली. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील ३५,१३६ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना ३५ कोटी रुपये किंमतीची २,३४,७८१ उपकरणे वितरीत केले जाणार आहेत. शनिवारी (ता.१७) मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना उपकरणे वितरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना लाभ नागपुरात मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले व आभार सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड यांनी मानले.

प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.श्री. नितीन गडकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. यावेळी गणेश बंगदे व दिलीप खवास यांना कृत्रिम पाय, मो. आहान यांना सेलिब्रल पाल्सी चेअर, सुमन चंदनखेडे व प्रकाश भिसे यांना श्रवणयंत्र, अशोक राउत यांना कम्प्लिट डेंटल कीट, अशवाज शाहु यांना एमआर कीट, सुमित्रा वैद्य यांना व्हिल चेअर, इरशाद अंसारी व रिजवान यांना मोटराईज्ड ट्रायसिकल प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक

श्रवण यंत्र

एल्बो कक्रचेस

व्हीलचेअर

ट्रायपॉड्स

क्वॅडपॉड

कृत्रिम मर्डेचर्स

स्पेक्टल्स

क्वॅकपॉड

स्पेक्टल्स

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक

एल्बो कक्रचेस

एझलरी कक्रचेस (कुबडे)

कृत्रिम अवयव

श्रवण यंत्र

ट्रायपॉड्स

क्वैडपोड

व्हीलचेयर

ट्रायसिकल (मॅन्युअल)

ट्रायसिकल (बॅटरी)

कॅलीपस

TLM कीट

ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता)

डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)