Published On : Fri, Jul 12th, 2019

सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक

नागपूर : धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या दागिण्यावर हात साफ करणाºया सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे चोवीस तासाच्या आत त्याला पकडून सोन्याच्या दागिण्यांसह ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शेख सोहेल शेख खालिद (२२, रा. कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शेख सोहेल हा सराईत गुन्हेगार आहे. तो कामठी निवासी असला तरी शहरात भटकत असतो. धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेवून त्यांचे पाकिट लंपास करण्यात त्याचा हतखंडा आहे. केंद्रपाडा, ओडिशा निवासी जोगेंद्रसिंग देवरिया (३६) हे २२८६६ पूरी एलटीटी एक्स्प्रेसच्या एस-२ बोगीने ७२ क्रमांकाच्या बर्थहून कटक ते एलटीटी असा प्रवास करीत होते. सोबत त्यांची बहिण होती. बुधवार १० जुलै रोजी मध्यरात्री १.३५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली असता आरोपी शेख सोहेल याने त्यांच्या झोपेचा फायदा घेत देवरीया यांच्या बहिणाचा पर्स चोरला.

या पर्स मध्ये मोबाईल, ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख ३ हजार असा एकून ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. पर्स दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. तो पर्यंत गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली होती. दरम्यान त्यांनी वर्धा लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. नागपूर स्थानकावरील घटना असल्याने वर्धा पोलिसांनी शुन्यची कारवाई करून हे प्रकरण गुरूवारी नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले.

या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी एपीआय मुबारक शेख यांनी एक पथक तयार केले. या पथकात शेख यांच्यासह चंद्रशेखर मदणकर, हेड कॉन्स्टेबल आॅज्वेल्ड थॉमस, शैलेश उके, प्रवीण कौशिक, गजु शेळके यांचा समावेश होता. पथकाने मोमिनपुरा आणि रेल्वे स्थानकाच्या डी कॅबिनजवळ ट्रॅप लावला. दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास आरोपी शेख सोहेल हा डी कॅबिन जवळ येणार असल्याची माहिती मिळताच घेराव करून त्याला अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.