Published On : Sun, Jun 14th, 2020

नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नेतृत्व : नाग, पिली, पोहरा नदी मूळ स्वरूपात

नागपूर: नाग, पिली व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. ऐतिहासिक नाग नदी तर नागपूरवासीयांची ओळख. मात्र निसर्गाने दिलेला हा वारसा नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे विस्मृतीत जाऊ लागला. परिणामी एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या तीनही नद्यांच्या पुजरुज्जीवनाचा विडा उचलला आणि आज या नद्या आपल्या मूळस्वरुपात येऊ लागल्या आहेत. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनामुळे नागपूरला गतवैभव तर मिळालेच, शिवाय या वैभवात भरही पडली आहे.

Advertisement

नाग नदीच्या काठावर असलेल्या नागपूर शहराची संस्कृती ओळख जपणारी नाग नदीला मागच्या काही वर्षात नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या नागपूरच्या महत्त्वपूर्ण वारस्याला, शहराच्या धमन्यांना पुन्हा नद्यांचे स्वरुप देण्याचे कार्य मनपातर्फे केले जात आहे.

Advertisement

या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण ‍तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधी सोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.

नागनदी, पिली नदी किंवा पोहरा नदीची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते. मात्र या वर्षी नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र पाठविण्यात आला. प्रवाह मोकळा झाल्याने या नद्या कधी नव्हे इतक्या खळाळून वाहू लागल्या आहे. नदीतून काढलेल्या गाळ पुन्हा त्याच नदीत वाहून जाणार नसल्याने यावर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सी.एस.आर. निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम ‍विभाग, वेकोलि, मॉईल, एन.एच.ए.आय. आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.

तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग साफ करण्यात आला आहे. नाग नदी अंबाझरी ते पंचशील चौक ते मोक्षधाम घाट जवळून अशोक चौक ते सेंट झेव्हियर्स कॉन्व्‍हेंट ते पारडी पूल अशी ती वाहते.

पिली नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पिली नदी गोरेवाडा ते मानकापूर स्टेडियम ते कामठी रोड ते जुना कामठी रोड नाका ते नदीच्या संगमापर्यंत पुढे वाहत जाते. पोहरा नदी शंकर नगर ते नरेंद्र नगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहिरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. सद्यस्थितीतील नदीचा संपूर्ण भाग साफ करण्यात आलेला आहे.

नागरिकांची कृतीच जपू शकते वारसा : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे
मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करुन स्वच्छता झाली असून पुढे नागनदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. लवकरच आपल्याला नागनदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरु झाले आहे. भविष्यात नागनदीच्या किनाऱ्यावर बगीचे तयार होतील. या बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम करतील, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे.

त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. कधी नव्हे इतक्या नागपुरातील तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. दुर्गंधी नाहिसी झाली आहे. त्यानंतर हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, बांधकाम साहित्याचा कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement